Join us

शनिवार सोनसाखळी चोरट्यांचा

By admin | Updated: March 27, 2017 06:01 IST

शनिवारी पोलिसांच्या नाकावर टिच्चून घोडबंदर रोडवरील चार पोलिसांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

ठाणे : शनिवारी पोलिसांच्या नाकावर टिच्चून घोडबंदर रोडवरील चार पोलिसांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी तब्बल २ लाख ३७ हजारांचा ऐवज खेचून पळ काढताना महिलांसह पुरुषालाही टार्गेट के ले आहे. कोलशेत रोड, ढोकाळीनाका येथे राहणारे अजय सिंह (३२) हे शनिवारी रात्री पत्नीसह त्याच परिसरातील नंदीबाबा मंदिरात दर्शनासाठी पायी जात होते. तेव्हाच भरधाव वेगाने त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील सुमारे ४ तोळ्यांची सोन्याची चेन खेचून पळ काढला. तिची किंमत ९८ हजार रुपये असल्याचे त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.पी. पवार करीत आहेत. दुसऱ्या घटनेत, वसंतविहार येथील ७१ वर्षीय शारदा जोशी या पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तिसऱ्या घटनेत, पोखरण रोड नंबर २ येथील सुनीता प्रसाद यांच्याही गळ्यातील ३० हजारांचा ऐवज खेचण्यात आला. या दोन्ही प्रकरणी चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी.पी. बनगोसावी करीत आहेत. चौथ्या घटनेत, घोडबंदर रोडवरील श्री गजानन सोसायटीत राहणाऱ्या ४२ वर्षीय सायली भोगले यांच्या गळ्यातील ४९ हजारांचा ऐवज खेचून चोरट्यांनी मोटारसायकलवरून पळ काढला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.डी. सावंत करीत आहेत. (प्रतिनिधी)