मुंबई : स्थापत्य अभियंत्याच्या व्यावसायिक संघटना आणि अमेरिका सोसायटी आॅफ सिव्हिल इंजिनीअर्स या जागतिक स्तराच्या संघटनेने अभियांत्रिकी विद्यार्थी परिषदेचे आयोजन केले होते. ‘शाश्वत विकास’ या विषयावर झालेल्या स्पर्धेत विलेपार्ल्याच्या मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेळी टीम लीडर विनय व्होराच्या नेतृत्वाखाली पार्थ मोरबिया, वेदांत गांधी आणि निक्षा खेमका यांनी पाच पारितोषिकांवर नाव कोरले. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनात आलेल्या जागतिक परिषदेच्या विविध स्पर्धांत १३ देशांच्या संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये वजनाने हलक्या, पण विशेष प्रकारच्या काँक्रिटच्या नौका तयार करून त्या ३२५ फूट पाण्यात वल्हवून दाखवणे, एक टन वजन पेलणारे स्टीलच्या ब्रीडचे मॉडेल तयार करणे, अशा स्पर्धांचा समावेश होता. त्याचबरोबर, पर्यावरणपूरक प्रकल्प, हवेतल्या बाष्पापासून पाणी तयार करणारे उपकरण, हरित इमारत पिझोमीटरच्या मदतीने वीज तयार करणे, कचरा व्यवस्थापन यांचे अत्याधुनिक मॉडेल तयार करत, भारतीय विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला. विविध देशांच्या स्पर्धकांना मागे सारत, मुंबईकरांनी अव्वल क्रमांक पटकावला. (प्रतिनिधी)
सातासमुद्रापार मुंबईकरांचा झेंडा
By admin | Updated: June 15, 2016 02:31 IST