Join us

सातारा' म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:06 IST

‘सातारा’ म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय...!सध्या सुरू असलेल्या ‘मुलगी झाली हो’ या तुमच्या मालिकेबद्दल काय वाटते?‘मुलगी झाली हो’ ...

‘सातारा’ म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय...!

सध्या सुरू असलेल्या ‘मुलगी झाली हो’ या तुमच्या मालिकेबद्दल काय वाटते?

‘मुलगी झाली हो’ या आमच्या मालिकेचा विषय सामाजिक आहे. समाजात घडणाऱ्या एका घृणास्पद गोष्टीबद्दल भाष्य करणारा आहे. आजही अनेक घरांमध्ये मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो. मुलाला झुकते माप दिले जाते आणि मुलगी ही परक्याचे धन समजून तिला दुय्यम वागणूक दिली जाते. स्त्री-भ्रूणहत्येचे प्रमाणही आपल्याकडे बरेच आहे. मी स्वतः ग्रामीण भागातून आलो आहे आणि मुलगी गर्भातच मारून टाकायची वगैरे प्रकार मी जवळून पाहिले आहेत. अतिशय काळजाला भिडणारा असा या मालिकेचा विषय आहे. लोक या मालिकेवर भरभरून प्रेम करत आहेत आणि त्यामुळे टीआरपीमध्येही ही मालिका क्रमांक एकवर आहे. या विषयावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसोबत मी कामही केले आहे. त्यामुळे मला ही मालिका जवळची वाटते.

या मालिकेच्या व्यतिरिक्त काय सुरू आहे?

या मालिकेच्या व्यतिरिक्त नाटक, चित्रपटविषयक माझे विविध उपक्रम सुरू आहेत. साताऱ्यात माझा नाटकाचा ग्रुप आहे आणि तिथे आमचे काम सुरूच असते. दोन चित्रपट मी लिहून पूर्ण केले आहेत. एका नवीन चित्रपटाचे लेखन सुरू आहे. यात मी बराच गुंतलेला आहे. हे चित्रपट पडद्यावर यावेत, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत नाटकासंबंधी बरेच काम केले, पण चित्रपट आणि मालिकांच्या विषयी बऱ्याच गोष्टी शिकायच्या राहून गेल्या आहेत. मला अभिनयाचे वेड असले, तरी लेखन व दिग्दर्शन ही माझी आवड आहे. स्क्रीन रायटिंगचा एक कोर्स मी मध्यंतरी केला. या सगळ्याचा फायदा माझ्यातल्या अभिनेत्याला नक्कीच होतो. याशिवाय हिंदीतील काही नवीन प्रोजेक्ट्सविषयी मला विचारणा होत आहे.

साताऱ्याच्या मातीबद्दल कशी ओढ आहे?

सातारची माती माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. सातारा हा माझा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. साताऱ्यात मी लहानाचा मोठा झालो. ‘किरण माने’ हे व्यक्तिमत्त्व साताऱ्यानेच घडविले. साताऱ्यात मला नाटक तर मिळालेच, पण त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्थांची कामे मी जवळून पाहिली. नरेंद्र दाभोलकर यांच्यापासून अनेक समाजसेवक मी जवळून अनुभवले. त्यामुळे एक प्रकारचे समाजभान आले. माझ्या शेजारीच नरेंद्र दाभोलकर राहायचे. त्यांच्याकडे निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, डॉ.श्रीराम लागू वगैरे मंडळी यायची. नटांना समाजभान का आणि कसे असावे, हे मला अगदी नकळत्या वयापासून समजायला लागले. त्यामुळे माझ्यातल्या नटासह माझ्यातला सामाजिक कार्यकर्ताही घडत गेला. नाटक आणि समाज हे मला वेगळे करताच येत नाही. त्याचबरोबर, साताऱ्याने मला पर्यावरणाचे भान दिले. साताऱ्याने मला संघर्षाचे बळ दिले, निर्भीडपणा दिला, हिंमत दिली. सातारकरांचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. सातारा हा कायम माझ्या काळजाच्या जवळचा विषय आहे.

रंगभूमीवर पुन्हा कधी दिसणार?

हा प्रश्न मला अतिशय भावनिक करणारा आहे. लॉकडाऊनच्या आधी माझे ‘झुंड’ नावाचे नाटक सुरू होते. सध्या ‘एक दिवस एक रात्र’ या माझ्या नवीन नाटकाची तयारी सुरू आहे. या नाटकाचे प्रयोग लवकरच सुरू होतील. प्रायोगिक रंगभूमीवरही काही वेगळे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या आपल्या अवतीभवती सुरू असलेला, एक गंभीर विषय प्रायोगिक नाटकातून मला समोर आणायची इच्छा आहे.

भविष्यात नक्की काय करायला आवडेल?

मला भविष्यात चित्रपट, नाटक, विशेषतः प्रायोगिक नाटकांत विविध प्रयोग करायचे आहेत. प्रायोगिक रंगभूमीवर मनातले विषय मांडता येतात. नाटक व्यवसाय करेल का वगैरे प्रश्न इथे नसतात. इथे मनापासून व्यक्त होता येते. व्यावसायिक रंगभूमीसह प्रायोगिक रंगभूमीही मला जवळची वाटते. त्या दृष्टीने बरेच काही करायचे आहे. माझे नाटक सुरूच असते, पण चित्रपट या माध्यमाला सामोरे जायची इच्छा आहे. चित्रपट माध्यमाकडे वळण्याचा मी गांभीर्याने प्रयत्न करत आहे.