Join us  

आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो; मोहन भागवतांनी बाबासाहेबांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 9:49 AM

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

मुंबई:  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांनी आज सकाळी 5.07 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण  पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री.बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्ती करिता तत्व रूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली, असं मोहन भागवत यांनी सागितलं. 

दादरा नगर हवेली च्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून तेहि लढले होते. शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतुनच "जाणता राजा" सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे स्फूर्तीदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील. त्यांच्या पवित्र व प्रेरक स्मृतीला माझी व्यक्तिगत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विनम्र श्रद्धांजली, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआची लागण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली होती. त्यानंतर, सकाळी रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे 15 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे 5.17 मिनिटांनी निधन झाले. त्यांचे पार्थीव सकाळी 7.30 वाजता पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, असे या पत्रकातून कळविण्यात आले आहे.  

टॅग्स :बाबासाहेब पुरंदरेमोहन भागवत