Join us  

सारस्वत बँकेतर्फे राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 10:31 AM

सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटींचा धनादेश सुपूर्द केला.

मुंबई : कोकणातील रायगड, महाड, खेड, संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी तसेच कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर सर्व विभागांत आलेल्या महापुरामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सारस्वत बँकेने पुढाकार घेतला आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे.बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, जेष्ठ संचालक किशोर रांगणेकर व मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार जैन यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा रुपये एक कोटींचा धनादेश त्यांना सुपूर्त केला आहे.

कोकण, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भ आणि इतर सर्व विभागांत अतिवृष्टी, समुद्राला आलेली भरती आणि धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक गावांतील पाण्याची पातळी वाढून गावं जवळजवळ १० फूट पाण्याखाली गेली. घरात पाणी शिरल्याने रहिवाश्यांचे संसार मातीमोल झाले आहेत. जनजीवनासोबत, उद्योगधंदे तसेच शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या रोगराईचा सामना करण्यासाठी, पूरग्रस्त महाराष्ट्रातील जनतेला या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी व त्यांचे पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनातर्फेही विविध योजना राबविल्या जात आहेत. महाराष्ट्रातील जनतेसाठी सारस्वत बँकेने यापूर्वीही अनेक बिकट परिस्थितीत सर्वोतोपरी योगदान दिले आहे. आपली सामाजिक बांधिलकीची परंपरा जपणाऱ्या सारस्वत बँकेने पुन्हा एकदा एक पाऊल पुढे टाकत ह्या जलप्रकोपात उध्वस्त झालेल्या पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करून त्यांना पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी हातभार लावण्याचे ठरविले आहे.

सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटींचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, ज्येष्ठ संचालक किशोर रांगणेकर व मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार जैन आदी. 

टॅग्स :पूरबँकउद्धव ठाकरे