Join us

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडची कोंडी वाढली

By admin | Updated: May 9, 2015 03:35 IST

कुर्ला पश्चिमेकडील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील बौद्ध कॉलनी येथून कुर्ला स्थानकाकडे जाणारा मार्ग बंद करत तो पुढे वळविण्यात आला आहे.

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील बौद्ध कॉलनी येथून कुर्ला स्थानकाकडे जाणारा मार्ग बंद करत तो पुढे वळविण्यात आला आहे. प्रत्यक्षात वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून हा उपाय करण्यात आला असला तरी या वळणामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी त्यात भर पडली आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तब्बल ४२० कोटी रुपये खर्च करून सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड बांधला आहे. वाहतूक कोंडी कमी होण्यासह प्रवाशांचा वेळ वाचविणे हा प्रकल्पाच्या मागचा प्रमुख उद्देश आहे. हा रस्ता सुरू झाल्यानंतर कुर्ला पश्चिमेकडून थेट पूर्वेला जाणे वाहन चालकांना सोयीस्कर झाले आहे. मात्र आता लिंक रोडवरील कुर्ला पश्चिमेकडील बौद्ध कॉलनी येथे कुर्ला स्थानकाकडे जाणारे उजवे वळण वाहनांसाठी बंद केले आहे. परिणामी येथील वळणाऐवजी आता कुर्ला स्थानकाकडे जाण्यासाठी थेट कुर्ला टर्मिनसजवळील वळणाहून वाहने वळवावी लागल्याने प्रवाशांचा वेळ वाया जात असून, उजवीकडील वळण बंद केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार, कुर्ला स्थानकाकडे जाणारे उजवे वळण बंद करण्यापूर्वी परिपत्रक काढणे गरजेचे होते. (प्रतिनिधी)