Join us
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारभारतीची रांगोळी अवतरली बालविकासच्या प्रांगणात

By मनोहर कुंभेजकर | Updated: August 20, 2023 19:10 IST

कलेची अनुभूती देणारी ही रांगोळीची मोफत प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबईभारतीय अस्मितेचा अविभाज्य घटक रांगोळी हा भारतीय प्राचीन कलेचा सुसंस्कार,सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याचे प्रतिक आहे.आज संस्कारभारतीची रांगोळी जोगेश्वरी (पूर्व) येथील बालविकास विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणात अवतरली.

कलेची अनुभूती देणारी ही रांगोळीची मोफत प्रशिक्षण कार्यशाळा  रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी जनमानसात एकात्मतेचा संदेश पसरविण्यासाठी बाल विकास विद्या मंदिर शाळेतील शिक्षक व पालकांसाठी आयोजित केली होती.

गणपती उत्सवापासून ते राष्ट्रीय सणांपर्यंत आनंददायी मंगलमय प्रसंगी रांगोळी उपयुक्त ठरते. तसेच रांगोळी ही महिलांसाठी आपले कलाकौशल्य दाखविण्याची योग्य संधी ठरते. महिलांच्या कलागुणांना वाव देणे हा उद्देश समोर ठेवून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहितीघोसाळकर यांनी दिली.

या कार्यशाळेत प्रशिक्षक इंद्रायणी सावंत यांनी संस्कार भारती रांगोळीतील प्रत्येक शुभचिन्हे (गोपद्य ,केंद्रवर्धिनी शृंखला इ.) समजावून सांगत त्यांची प्रात्यक्षिके सादर केली. तसेच संस्कारभारती रांगोळी ही एकाग्रतेने काढली तरच ती सुबक  तयार होते असेही सांगितले .सर्व सहभागी शिक्षक व पालकांनी  रांगोळीचा सराव केला. शेवटी सर्वांनी मिळून एक मोठी आकर्षक रांगोळी काढली. 

या कार्यक्रमास शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनाली परब, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक जगदीश सूर्यवंशी,शिक्षक व पालकही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना जाधव यांनी केले.

टॅग्स :मुंबई