Join us  

संजीव पुनाळेकर, भावे यांची पानसरे हत्येप्रकरणीही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 3:50 AM

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा वकील संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांच्याकडे सीबीआय कसून तपास करीत आहे.

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा वकील संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांच्याकडे सीबीआय कसून तपास करीत आहे. सोमवारी त्यांना पुण्यातील घटनास्थळी नेऊन माहिती घेण्यात आली. दरम्यान, ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅड. गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी या दोघांचा संबंध आहे का? यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.पुनाळेकर आणि भावे या दोघांना शनिवारी मुंबईतून अटक करण्यात आली असून, त्यांना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांचे घर व कार्यालयाची झडती घेण्यात आली असून, अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याचे सांगण्यात येते. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर अ‍ॅड. संजीव पुनाळेकर हा त्यांच्या बचाव प्रक्रियेत सक्रिय असायचा. त्या वेळी त्याने केलेले प्रत्येक वक्तव्य, प्रसिद्धी माध्यमांशी केलेल्या संभाषणाची पडताळणी केली जात आहे. भावेने मारेकऱ्यांना मोटारसायकल मिळवून देण्यासाठी मदत केली होती. तर हल्ल्यानंतर पुनाळेकर याने मारेकरी शरद काळसकरला पुरावे नष्ट करण्याबाबत मार्गदर्शन केल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळालेली आहे. पुनाळेकर व भावे यांचा या आणि अन्य प्रकरणांशी काही संबंध आहे का? याबाबत तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.>पुनाळेकरला अटक करा, डाव्या आघाडीची मागणीकोल्हापूर : अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील साक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल संजीव पुनाळेकरला त्वरित अटक करावी, सनातन संस्थेवर बंदी घालावी, आदी मागण्यांसाठी सोमवारी सायंकाळी डावी आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी देशमुख यांनी, तपासात नावे निष्पन्न होतील तशी कारवाई होणारच असल्याचा निर्वाळा शिष्टमंडळास दिला. दहशतवादी कारवायांमध्ये अडकलेल्या व धार्मिक कार्याच्या बुरख्याआडून खुनी हिंसक, अतिरेकी कारवाया करणाºया या आरोपींना दहशतवादी व अतिरेकी म्हणून जाहीर करावे, असे सांगून डाव्या आघाडीच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक देशमुख यांना देण्यात आले.

टॅग्स :नरेंद्र दाभोलकर