Join us  

बदनामीचा दावा ठोकला तरी आरोप करणारच - संजय निरुपम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 5:16 AM

रिलायन्सने ठोकलेल्या बदनामीच्या खटल्यामुळे गप्प बसणार नाही. जनतेच्या वतीने प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा आहे का, असा सवाल करतानाच वीजपुरवठा क्षेत्रातील अनिल अंबानी आणि अदानी यांच्यातील व्यवहाराबाबत केलेल्या आरोपांवर ठाम असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी स्पष्ट केले.

मुंबई : रिलायन्सने ठोकलेल्या बदनामीच्या खटल्यामुळे गप्प बसणार नाही. जनतेच्या वतीने प्रश्न उपस्थित करणे हा गुन्हा आहे का, असा सवाल करतानाच वीजपुरवठा क्षेत्रातील अनिल अंबानी आणि अदानी यांच्यातील व्यवहाराबाबत केलेल्या आरोपांवर ठाम असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी बुधवारी स्पष्ट केले.रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे बाजारभावानुसार मूल्य ५,५७५ कोटी रुपये आहे. तरीही अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीने १८,८०० कोटी रुपयांना ती विकत घेतली. शिवाय, अदानी ट्रान्समिशन या कंपनीवर आधीपासूनच फार मोठे कर्ज आहे. या व्यवहारामुळे या सर्व कर्जाचा बोजा वीजदरवाढीच्या रूपाने सामान्य वीजग्राहकांवर पडणार असेच चित्र दिसून येत आहे. या व्यवहारामुळे मुंबईमध्ये उपनगरातील वीजग्राहकांवर वीजदरवाढीचे मोठे संकट कोसळण्याची भीती आहे. रिलायन्सने माझ्यावर बदनामीचा खटला ठोकला असला तरी मी गप्प बसणार नाही. अनिल अंबानींनी बदनामीचा दावा ठोकण्यापूर्वी या व्यवहाराची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर आणि मुंबईतील जनतेसमोर ठेवावी, असी मागणीही निरुपम यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली.राफेल व्यवहाराचे कॉन्ट्रॅक्ट रिलायन्स डिफेन्सला मिळाले. यात फार मोठा घोटाळा झाल्याचे दिसत आहे. कारण भाजपा सरकार खरेदी करण्यात आलेल्या प्रत्येक विमानाच्या किमतीची माहिती उघड करू इच्छित नाही. जर या विमानखरेदीमध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, तर या व्यवहाराची माहिती न्यायालयासमोर का उघड केली जात नाही? त्यात लपविण्यासारखे असे काय आहे, असा प्रश्नही निरुपम यांनी उपस्थित केला.

टॅग्स :संजय निरुपम