Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, कुटुंब रंगणार नाटकात;  ‘अस्तित्व’चे विशेष प्रयोग, पालिकेचे आयोजन

By जयंत होवाळ | Updated: July 15, 2024 21:08 IST

कर्मचाऱ्यांसोबत त्याच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांनादेखील मोफत प्रवेश देण्यात येणार

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी संपूर्ण शहरातील कचरा संकलित करतात. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटत असतात. या कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी, ते रोज करीत असलेल्या कामातून त्यांना त्यांच्या परिवाराला ऊर्जा मिळावी, यासाठी हे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘अस्तित्व’ नाटकाचे विशेष प्रयोग दाखविले जाणार आहेत. आयुक्त भूषण गगराणी यांनी हा उपक्रम राबविला आहे. यावेळी कर्मचाऱ्यांसोबत त्याच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांनादेखील मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात १९ जुलैला स. ११ वाजता, बोरिवलीतील (पश्चिम) प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यगृह येथे २२ जुलैला, तर भायखळ्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात २३ जुलैला या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित असलेले हे नाटक महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये दाखविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेता भरत जाधव यांच्या ‘भरत जाधव एंटरटेन्मेंट’ या संस्थेने साकारलेले ‘अस्तित्व’ नाटक सध्या रंगमंचावर गाजत आहे.

रोजच्या जगण्यात वाढत जाणाऱ्या अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचे अस्तित्व शोधणार हे कौटुंबिक नाटक आहे. स्वप्निल जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकात भरत जाधव यांच्यासह चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर प्रमुख भूमिकेत आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका