Join us

सेंट जॉर्ज रुग्णालयात आज ललितावर होणार लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:08 IST

या रुग्णालयाचे प्लॅस्टिक सर्जन डॉ. रजत कपूर हे ललितावर पहिली शस्त्रक्रिया करणार आहेत.

मुंबई : लिंगपरिवर्तनासाठी नुकतीच परवानगी मिळालेली बीडची पोलीस कॉन्स्टेबल ललिता साळवे हिच्यावर शुक्रवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया होणार आहे. लिंगपरिवर्तनाच्या प्रक्रियेतील ही पहिली महत्त्वाची शस्त्रक्रिया असेल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. गेली २९ वर्षे स्त्री म्हणून जगणारी ललिता आता काही महिन्यांनी ‘पुरुष’ म्हणून आपली ओळख बनविणार आहे.याविषयी सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले की, शस्त्रक्रियेपूर्वी ललिताच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात हिमोग्लोबिन, ईसीजी, सोनोग्राफी, एक्स-रे इ. काही चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यांचे वैद्यकीय अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त होतील त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येईल.या रुग्णालयाचे प्लॅस्टिक सर्जन डॉ. रजत कपूर हे ललितावर पहिली शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यांनी या आव्हानात्मक शस्त्रक्रियेविषयी सांगितले की, या शस्त्रक्रियेतील ललिताच्या शरीरातील गर्भाशय, स्तन काढून टाकण्यात येणार आहे. लिंगपरिवर्तनाच्या प्रक्रियेतील ही पहिली शस्त्रक्रिया असून आणखी ४-५ शस्त्रक्रिया ललितावर करण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियेदरम्यान ललिताच्या शारीरिक व मानसिक स्थितीचे सातत्याने मूल्यमापन करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.नव्या ओळखीसाठी उत्सुकलिंगपरिवर्तन प्रक्रियेचा खर्च परवडणारा नसल्याने यासाठी आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी ललिताची धडपड सुरू आहे. या शस्त्रक्रियेविषयी ललिताने सांगितले की, इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आता मी बदलाच्या वाटेवर आहे. नवे आयुष्य जगण्यासाठी, नव्या ओळखीसाठी उत्सुक आहे.

टॅग्स :लिंगपरिवर्तन