Join us  

ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात अनियमितता, समीर वानखेडेंचीही होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 8:20 AM

एनसीबीप्रमुख एस. एन. प्रधान; समीर वानखेडेंचीही होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कॉर्डेलिया ड्रग्ज प्रकरणाच्या प्राथमिक तपासांत अनियमितता आढळून आली असून, याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे एनसीबी प्रमुख एस. एन. प्रधान यांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात गरज वाटल्यास एनसीबीचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांची पुन्हा चौकशी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीच्या तपासांत बऱ्याच त्रुटी आढळून आल्या आहेत. तसेच, या प्रकरणात झालेल्या पैशांच्या व्यवहाराबाबतही अधिक तपास सुरू आहे. याबाबतचा अहवालदेखील लवकरच समोर येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आर्यन खान याला एनसीबीने अटक केल्यानंतर एनसीबी आरोपांच्या फेऱ्यात अडकली. यात आर्यन खान याला सोडण्यासाठी २५ कोटींची मागणी झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पैसे वसुलीच्या आरोपात अडकलेल्या सॅनविल एड्रियन डिसूझा ऊर्फ सॅम डिसूझा याच्यावर एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याच्यासह मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. यादरम्यान पंच प्रभाकर साईलचाही मृत्यू झाला आहे. या पैशांच्या व्यवहाराच्या दिशेने एनसीबीचे विशेष पथक अधिक तपास करीत आहे.  त्यामुळे या अहवालातून काय समोर येते याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागले आहे. 

     २ ऑक्टोबर : रात्री उशिरा मुंबई क्रुझ टर्मिनलवरील कॉर्डिलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकला     ३ ऑक्टोबर : आर्यनला अटक आणि एक दिवसाची एनसीबी कोठडी ४ ऑक्टोबर : एनसीबी कोठडीत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढ     ७ ऑक्टोबर : न्यायालयीन कोठडीत रवानगी, जामिनासाठी अर्ज. आर्यन आर्थर रोड कारागृहात, कोरोना नियमावलीनुसार आठवड्याभरासाठी

विलगीकरण कक्षात

 ८ ऑक्टोबर : जामिनावर सुनावणी, एनसीबीकडून आक्षेप. मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयाने जामीन फेटाळला     ११ ऑक्टोबर : विशेष एनडीपीएस न्यायालयात जामिनासाठी अर्ज     १३ ऑक्टोबर : जामिनावर सुनावणी, एनसीबीकडून विरोध     १४ ऑक्टोबर : न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी निकाल राखून ठेवला.     २० ऑक्टोबर : न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.     २६ ऑक्टोबर : उच्च न्यायालयात सुनावणी सुरू.     २७ ऑक्टोबर : आर्यन, अरबाज, मुनमुनचा युक्तिवाद पूर्ण.     २८ ऑक्टोबर : उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.     ३० ऑक्टोबर : आर्थर रोड कारागृहातून बाहेर पडला.

टॅग्स :समीर वानखेडेआर्यन खान