Join us  

समीर वानखेडे मुस्लीम नाहीत, जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट; नवाब मलिक तोंडावर आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 12:18 PM

Sameer Wankhede: नवाब मलिकांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. तसे कोणतेही पुरावे सापडलेले नसल्याचे सांगत समितीने ही तक्रार फेटाळून लावली.

मुंबई: मुंबई क्रुझ ड्रग प्रकरण (Cruise Drug Case) आणि त्यानंतर बॉलिवूड किंग शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) अटकेप्रकरणी चांगलेच चर्चेत आलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी (Nawab Malik) जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र, जातपडताळणी समितीकडून समीर वानखेडे यांनी क्लीन चिट देण्यात आली असून, समीर वानखेडे मुस्लीम नसल्याचा निष्कर्ष समितीने काढल्याचे सांगितले जात आहे.

आर्यन खानच्या अटकेनंतर नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. इतकेच नाही, तर समीर वानखेडे यांनी जात बदलल्याचा दावा करत नवाब मलिक यांच्यासह चौघाजणांनी जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. प्रशासकीय सेवेतील नोकरी मिळवताना समीर वानखेडे यांनी आपली खोटी जात सांगितल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. ते धर्माने मुस्लीम आहेत, असा दावा मलिक यांनी केला होता. मात्र, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. 

समितीने तक्रार फेटाळून लावली

समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचे कुठेही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे हिंदू महार हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. तसेच यासंदर्भात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे समितीने ही तक्रार फेटाळून लावली आहे. हा समीर वानखेडे यांच्यासाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे. तत्पूर्वी, एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या तपासाविषयी अनेक दोषारोप झाले होते. नवाब मलिक यांनी हे प्रकरण लावून धरले होते. 

दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला खोटा असल्याचा आरोप केला होता. यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दाखला प्रसारमाध्यमांसमोर मांडला होता. वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. बारकाईने पाहिल्यास त्यात बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच वडिलांच्या आधीच्या कागदपत्राच्या आधारावर समीर वानखेडे यांनी आपली कागदपत्रे तयार केली. बोगस कागदपत्राच्या सहाय्याने त्यांनी एका मागासवर्गीय मुलाचा अधिकार हिसकावून घेतला, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. 

टॅग्स :समीर वानखेडेनवाब मलिकमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीआर्यन खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो