Join us

वाड्यातील ग्रामीण रुग्णालयाचा भार एकाच वैद्यकीय अधिका-यावर

By admin | Updated: November 16, 2014 23:43 IST

ग्रामीण रुग्णालयात एक हजारांहून अधिक बाह्यरुग्ण रोज उपचारासाठी दाखल होत असताना केवळ एकाच वैद्यकीय अधिका-यांवर भार असल्याने त्यांच्यावर आजारी पडण्याची वेळ आली आहे.

वाडा : ग्रामीण रुग्णालयात एक हजारांहून अधिक बाह्यरुग्ण रोज उपचारासाठी दाखल होत असताना केवळ एकाच वैद्यकीय अधिका-यांवर भार असल्याने त्यांच्यावर आजारी पडण्याची वेळ आली आहे.या रुग्णालयात वाडा तालुक्यासह विक्रमगड, मोखाडा आणि शहापूर तालुक्यांतील काही गावांतून रुग्ण उपचारासाठी येत असल्याने येथील ओपीडीत १००० ते १२०० रुग्णांची नोंद असते. गेल्या सहा महिन्यांपासून येथे आलेले वैद्यकीय अधिकारी विविध कारणांनी बदलत असल्याने येथील रुग्णांना खासगी महागड्या सेवेचा आसरा घ्यावा लागतो. सतीश रूद्र हे एक महिन्यापासून रुग्णालयात रुग्ण तपासणीकरिता येत असून त्यांना मराठी भाषा समजत अथवा येत नसल्याने रुग्णांची तपासणी रामभरोसे आहे. गेली तीन वर्षे हे रुग्णालय पुरेशा वैद्यकीय अधिकाऱ्यांविना सुरू असून जिल्हा परिषद व शासनाच्या आरोग्य सेवेबद्दलच्या अनास्थेवर तालुक्यात संताप आहे. ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे. (वार्ताहर)