ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - मुंबई महानगरपालिका निवडणुकीतून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या संभाजी ब्रिगेडने शिवसेनेवर सरशी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाची कोंडी करण्यासाठी गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना शिवसेनेने मुंबईत आणले होते. मात्र हार्दिक नादान असून हे त्याचे वैयक्तिक मत असल्याचे पाटीदार अनामत आंदोलन समितीचे आंदोलक चिराग पटेल यांनी सांगितले आहे.
पटेल म्हणाले की, हार्दिक तरूण असून नादान आहे. गुजरातमध्ये पाटीदार समाजावर अन्याय करणाऱ्या भाजपाच्या सहयोगी पक्षाला पाटीदार बांधव कधीच समर्थन देणार नाही. सेनेची विचारधारा भाजपासोबत असून त्याला कधीही पाठिंबा देता येणार नाही. समितीच्या समन्वयकांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
हार्दिक 'नादान'
जिजाऊंचा अपमान करणाऱ्या आणि प्रांतवादावर विश्वास असलेल्या शिवसेना व मनसेसारख्या पक्षांना पाटीदार समाज कधीही समर्थन देणार नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, तुरूंगातून सुटल्यानंतर हार्दिक समाजवादी पार्टी, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि सेना अशा विविध पक्षांना पाठिंबा देत आहे. त्याचे वय 23 वर्षे असल्याने त्याला समज नाही. मात्र समाजात चुकीचा संदेश जाऊ नये, म्हणून समितीमधील इतर नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर हा खुलासा करत असल्याचे पटेल यांनी सांगितले.