Join us

आयएनएस दिल्लीला सलाम

By admin | Updated: November 23, 2015 01:52 IST

विनाशिका असलेली आयएनएस दिल्ली आणि येमेनमधून भारतीयांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आयएनएस तरकशला ३२ हजार मुंबईकरांनी भेट देऊन सलाम केला आहे.

मुंबई : विनाशिका असलेली आयएनएस दिल्ली आणि येमेनमधून भारतीयांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आयएनएस तरकशला ३२ हजार मुंबईकरांनी भेट देऊन सलाम केला आहे. भारतीय नौदलाकडून नौदल सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्ताने या दोन युद्धनौका मुंबईकरांच्या भेटीसाठी फोर्ट बेलार्ड इस्टेट येथे आल्या होत्या. नोव्हेंबरच्या १४, १५, २१ आणि २२ तारखेला मुंबईकरांना या युद्धनौका पाहण्याची संधी नौदलाकडून उपलब्ध करण्यात आली होती. या चार दिवसांत हजारो मुंबईकरांनी भेट दिल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. आयएनएस दिल्ली श्रेणीतील विनाशिका १७ नोव्हेंबर १९९७ रोजी नौदलात दाखल झाली. १९९२मध्ये आयएनएस दिल्लीच्या प्रत्यक्ष बांधणीस सुरुवात झाली. या विनाशिकेचे बांधकाम माझगाव गोदीत झाले. त्याचा आराखडा प्रोजेक्ट १५ या नावाने १९७७मध्येच तयार झाला होता. सध्या या विनाशिकेवर २ सी-किंग हेलिकॉप्टर, ५ पाणतीर, रडार, एके-१00 एमएम गन आणि एके-६३0 प्रकारातील गनसह अन्य शस्त्रे आहेत. भारत व रशिया संयुक्त बनावटीच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या आयएनएस तरकश या युद्धनौकेने येमेनमधून भारतीयांची व अन्य देशांच्या नागरिकांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.