मुंबई : सलमानच्या स्टारडममुळे त्याच्याविरोधातील खटल्याचा निकाल जाहीर करणारे सत्र न्यायाधीश देशपांडेही थोडे बुजले. निकालाचा तपशील सलमानला सांगताना ते अनेकदा अडखळले. त्यांची ती अस्वस्थता न्यायदालनात उपस्थित सर्वांनाच जाणवणारी होती. कदाचित हे दडपण झटकण्यासाठी न्या. देशपांडेंनी मध्येच सलमानची तारिफही केली. ते म्हणाले, सलमानचे चित्रपट तर सर्वच बघतात. तेव्हाही उपस्थितांमध्ये कुजबूज झाली. बुधवारी सकाळी अकराच्या ठोक्याला सलमानविरोधातील खटल्याचे कामकाज सुरू झाले. सुरुवातीलाच न्या. देशपांडे यांनी सलमानला तू दोषी आहेस, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात दोन वेळा संवाद झाला. त्यात त्यांनी निकालाचे तपशील सलमानला दिले. सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सलमानचा उल्लेख सेलीब्रेटी असा केला. तेव्हा न्या. देशपांडे यांनी स्मितहास्य केले. सलमानचे चित्रपट तर सर्वच बघतात, अशी तारिफ त्यांनी दिलखुलासपणे केली.कामकाज सुरू होण्यापूर्वीच न्या . देशपांडेंचे न्यायदालन खचाखच भरले होते. नव्याने येणाऱ्याला आत शिरण्यास, हालचाल करण्यास जराही वाव नव्हता. काही वेळाने बाहेर खोळंबलेल्यांनी आत जाण्याच्या धडपडीत पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे गोंधळ झाला. तेव्हा मात्र न्या. देशपांडे संतापले. त्यांचा राग अनावर झाला. कोर्टरूममच्या दरवाजातील सर्वांना तेथून लांब करा, शांतता राखा, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना सूचना केल्या.
सलमानच्या स्टारडममुळे न्यायाधीशही बुजले
By admin | Updated: May 7, 2015 05:43 IST