नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीस मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ७२९ जणांनी अर्ज घेतले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या २०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. अर्ज भरतानाही चार जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. अर्ज घेणे व भरणे सोपे व्हावे यासाठी १० विभाग तयार करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी गर्दी केली होती. दिवसभरात ७२९ जणांनी अर्ज घेतले. १०० रुपयांना अर्जांची विक्री सुरू असून, एका दिवसात ७२ हजार ९०० रुपये जमा झाले आहेत. तुर्भे विभागातून १३५ अर्ज गेले आहेत. दिघा विभागातून सर्वात कमी ४१ अर्ज गेले आहेत. निवडणूक विभागाने अर्ज भरताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या २०० मीटर परिसरामध्ये मनाई आदेश लागू केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना कार्यालयाच्या आवारामध्ये चार पदाधिकारी किंवा सूचक व अनुमोदक यांच्याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. कोणताही प्रचार करण्यास, सभा घेण्यास, घोषणाबाजी करण्यास व ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तीन वाहने घेऊन जाण्यास परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त वाहने नेण्यास मनाई आहे. (प्रतिनिधी)
पहिल्या दिवशी ७२९ अर्जांची विक्री
By admin | Updated: April 1, 2015 00:26 IST