- संजय घावरे मुंबई - संगीत रंगभूमी, बालरंगभूमी, प्रायोगिक रंगभूमीला स्वत:चे नाट्यगृह असावे हे रंगकर्मी विद्याधर गोखले यांचे स्वप्न होते. इथे मुंबईबाहेरून येणाऱ्या कलावंत आणि तत्रज्ञांना राहण्याची व्यवस्थाही असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण इथे हॉटेल चालवले जात असून रंगकर्मींना याचा फायदा होत नाही. आता ‘रंगशारदा’च विकण्याचा डाव आखण्यात आल्याची माहिती अभिनेते आणि विश्वस्त विजय गोखले तसेच सीए सुनील कर्वे यांनी ‘लोकमत’ला दिली.
याबाबत अधिक माहिती देताना कर्वे म्हणाले की, ‘रंगशारदा प्रतिष्ठान’ला प्लॅाट मिळताच सा.बां.विभागातील अभियंता प्रभुदास लोटिया यांनी गोखलेंची भेट घेऊन सर्व काम करण्याचे आश्वासन दिले.
हॉटेलच्या नावे लायसन्स नाहीसर्व विश्वस्त कला क्षेत्रातील असल्याने त्यांनी कागदपत्रे मिळवून इमारत उभारण्याची जबाबदारी लोटियांकडे सोपवत ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ दिली. लोटिया यांनी १९७९ पासून १९९३ पर्यंत बांधकाम केलेच नाही.
प्लॉटची सर्व कागदपत्रे ‘रंगशारदा प्रतिष्ठान’च्या नावे असूनही १९८३ मध्ये त्यांनी काही जागा विकण्यासाठी परस्पर बुकिंग घेतल्याचे आरटीआयद्वारे समजले. त्यावर रंगशारदा हॅाटेल प्रा.लि.चे संचालक गिरीश लोटिया आणि रंगशारदा प्रतिष्ठानतर्फे प्रभुदास लोटियांची स्वाक्षरी आहे. पैसेही त्यांनी हॉटेलच्या नावे घेतले. जानेवारी २०२०मध्ये प्रतिष्ठानने पोलिस तक्रार दाखल केली.
यादरम्यान लोटियांचे निधन झाले; पण पूर्णिमा शाह आणि मीना देसाई या त्यांच्या मुलींवर खटला सुरू आहे. आता रंगशारदा विकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत आम्ही पब्लिक नोटीसही दिली आहे. ‘रंगशारदा’च्या इमारतीत सुरू केलेले हॉटेल बेकायदेशीर आहे. लोटियांनी रंगशारदा हॉटेल प्रा.लि.च्या नावे लायसन्स घेतलेले नाही, असे विजय गोखले यांनी सांगितले.
विद्याधर गोखले यांचे स्वप्न उधळण्याचा डावकधी कोणाशी भांडायचे नाही, हे अण्णा-आईचे तत्त्व असल्याने वाद घातला नाही. आईच्या निधनानंतर कागदपत्रे पाहिल्यावर लोटियांच्या मुलींसोबत कायदेशीर लढाई सुरू आहे. ‘रंगशारदा प्रतिष्ठान’ला आर्थिक फायदा होत नसल्याने आमच्याकडे कायदेशीर लढाईसाठीही पैसे नाहीत.- विजय गोखले अभिनेते, विश्वस्त - रंगशारदा प्रतिष्ठान
चौथ्या मजल्यापासून अकराव्या मजल्यापर्यंत हॅाटेल आहे. लोटियांनी १७० कोटींहून अधिक कमाई केली आहे. अनधिकृत हॅाटेलची मार्केट व्हॅल्यू कोट्यवधींच्या घरात आहे. ओसी नसताना बांधलेल्या १२वा मजला भाडेतत्त्वावर दिला आहे. त्यावर ॲक्शन घ्यावी, असे अग्निशमन दलाने दीड-दोन वर्षांपूर्वी ‘म्हाडा’ला पत्रही पाठवले आहे, असेही गोखले यांनी सांगितले.