Join us  

किराणा दुकानात चक्क ‘एमडी’ची विक्री; ४ कोटी ५० लाख ७० हजारांचे ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 8:39 AM

उल्हासनगरातील हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका, बदलापूर पाइपलाइन रस्ता, एकवीरा ढाब्याजवळ राजेशकुमार प्रेमचंद तिवारी याचे किराणा मालाचे दुकान आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : नेवाळी नाका येथील एका किराणा दुकानात ड्रग्ज विकले जात असल्याचे कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईत उघडकीस आले आहे. या कारवाईत ४ कोटी ५० लाख ७० हजार रुपयांची ‘एमडी’ पावडर शुक्रवारी दुपारी जप्त करण्यात आली. याप्रकरणी हिल लाइन पोलिसांनी दुकानदार राजेशकुमार प्रेमचंद तिवारी व शैलेश राकेश अहिरवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिवारीला अटक केली आहे.

उल्हासनगरातील हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका, बदलापूर पाइपलाइन रस्ता, एकवीरा ढाब्याजवळ राजेशकुमार प्रेमचंद तिवारी याचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यात ‘एमडी’ ड्रग्ज पावडरची विक्री होत असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता ३ किलो ६ ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर मिळाल्याची माहिती हिल लाइन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली. एमडी ड्रग्ज पावडर विक्रीसाठी ठेवणारा दुकानदार तिवारी याला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांनी सांगितले. 

एमडी पावडरचा साठा पुरविणारा अहिरवार याचा शोध अन्वेषण विभाग घेत असल्याची माहिती पवार यांनी दिली. तपासात यातून मोठी माहिती उघड होण्याचे संकेत पवार यांनी दिले आहेत. पोलिसांनी एमडी ड्रग्ससह १ लाख ५९ हजार रुपयांचे मोबाइल, रोकड जप्त केली आहे. एवढ्या प्रमाणात कोण ड्रग्जचा पुरवठा करत होता, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :अमली पदार्थ