Join us

बंदी असेलेल्या अन्नपदार्थाची विक्री, नागपाडा येथे कारवाई; तिघांना अटक, तीन दुकानांना टाळे

By स्नेहा मोरे | Updated: November 22, 2023 23:46 IST

नागपाडा येथील परिसरातून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : नागपाडा येथील परिसरातून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, नागपाडा पोलीसांनी तिघांना अटक केली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. या कारवाईदरम्यान तब्बल ७ हजार ७८६ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

शहर उपनगरात प्रतिबंधित अन्न पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर, विभागातील अधिकाऱ्यांनी शहर उपनगरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धडक मोहीम राबविली आहे.

२३ नमुने पुढील विश्लेषणासाठी

नागपाडा येथील कामाठीपुरा येथील अफजल खान आणि सैबू शोएब खान आणि आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान प्रतिबंधित अन्न पदार्थांचे २३ नमुने पुढील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत, तसेच तिन्ही दुकानांना टाळे ठोकले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विविध परिसरात राबविण्यात आलेल्या कारवायांदरम्यान एकूण १ लाख ७ हजार ४२० रुपयांचा प्रतिबिंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.