ठाणे : मळ्यातील भाजीपाला थेट ग्राहकाच्या घरी पोहोचती करून त्यांची ताज्या भाजीची गरज पूर्ण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सरसावले आहे. ठाणे शहरातील नामांकित सुमारे ६५ गृहसंकुलांशी करार करून त्यांच्या कॅम्पसमध्ये हा भाजीपाला शेतकऱ्यांकडून माफक दराने विकला जाणार आहे.यासाठी भाजी उत्पादक शेतकरी गट आणिगृहसंकूल यांच्यामध्ये रीतसर करार केला जाणार आहे. या गृहसंकुलांमधील रहिवाशांना घरपोच ताजी भाजी मिळणार असून शेतकऱ्यांनाही त्यातून चांगला मोबदला मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहक आणि शेतकरी या दोघांमध्ये तिसरा दलाल राहणार राहणार नाही. यामुळे ग्राहकाला मिळणारी भाजी स्वस्तच राहणार असून त्यांचा लाभ सरळ शेतकऱ्यांनाच होणार आहे. कितीही चांगले पीक आले तरी शेतकऱ्यांना दलालांमार्फत विकाव्या लागणाऱ्या भाजीचा फारसा मोबदला मिळत नाही. यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी आता कृषी विभागाकडून खास शेतकऱ्याना भाजी विक्रीची परवानगी दिली जाणार आहे. या आधीही सुमारे दोन वर्षापूर्वी गृहसंकुलात भाजी विक्री करण्यात आली होती. पण तेव्हा हा प्रयोग फसला होता. भाजी विक्रीत शेतकऱ्यांकडून सातत्य राहिले नव्हते. याशिवाय ग्राहकांना हवी असलेली भाजी मिळत नव्हती. त्यामुळे ग्राहक नाराज होऊन बाजारात जात होता. तर काही शेतकरी गटानी बाजारभावाप्रमाणेच भाजी विकण्यास प्रारंभ केल्यामुळे हा प्रयोग फसला होता. आधीचा अनुभव आणि आताचे नवे नियोजन करून गृहसंकुलांमध्ये भाजी विक्रीसाठी शेतकऱ्याना कृषी विभागाने तयार केले आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. (प्रतिनिधी)याशिवाय ५० टक्के पर्यंतचे सरकारी अनुदानही कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार आहे. यामध्ये वाहनासाठी सुमारे दोन लाख रूपये अनुदानासह प्लॅस्टिक क्रेट आणि अन्य साहित्याला ५० टक्के अनुदान दिले जाणार असलयाचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी महावीर जंगटे यांनी सांगितले.
ठाण्यात ६५ गृहसंकुलांत ताज्या भाज्यांची विक्री !
By admin | Updated: May 16, 2015 22:52 IST