कोल्हापूर : घरोघरी राखी पौर्णिमा साजरी होत असताना जवान मात्र डोळ्यांत तेल घालून सीमेचे रक्षण करीत असतात. त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी आज, रविवारी ‘लोकमत’ सखी मंचच्या सदस्यांनी टी. ए. बटालियन येथील जवानांना राखी बांधून स्नेहाचा हा धागा दृढ केला.आपल्या घरापासून, कुटुंबीयांपासून दूर राहून देशाची सेवा करणाऱ्या जवानांसाठी दरवर्षी लोकमत सखी मंचच्या सभासदांनी जवानांना राखी बांधली. महादेव मंदिर, टेंबलाई टेकडी, टेंबलाईवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी लोकमत सखी मंच सदस्य उपस्थित होत्या. वीराचार्य शिक्षण संस्था, संचलित विजया पाटील, विद्यामंदिर मौजे डिग्रज, पुरंदर नाभिराज देमापुरे प्राथमिक शाळा जयसिंगपूर, के. सी. वग्याणी प्राथमिक शाळा, मनपा आबासो सासने विद्यालय या शाळांनी व वाचकांनी लोकमत कार्यालयात राख्या आणून दिल्या होत्या. त्या राख्या एकत्रितपणे सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यासाठी मराठा लाईफइंट्रीकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी १०९ टी. ए. बटालियनचे (प्रादेशिक सेना) सुभेदार दिनकर कोंडेकर, हवालदार अनिल लांगे, हवालदार भगवान कुंभार, नायक बिराजदार पाटील, सुभाष बत्ते, प्रमोद पाटील, शिपाई उत्तम पाटील, शाम हंबीरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘सखीं’नी जोडला जवानांशी स्नेहधागा
By admin | Updated: August 11, 2014 00:23 IST