Join us  

मराठीच्या प्रचारासाठी हैदराबादेतील ज्येष्ठ नागरिकाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 2:36 AM

राज्याबाहेरील साहित्यप्रेमींना दर्जेदार मराठी साहित्याची ओळख व्हावी, यासाठी हैदराबादमधील एक ऐंशी वर्षीय मराठीप्रेमी अविरत धडपडत आहेत.

संकेत सातोपे मुंबई : राज्याबाहेरील साहित्यप्रेमींना दर्जेदार मराठी साहित्याची ओळख व्हावी, यासाठी हैदराबादमधील एक ऐंशी वर्षीय मराठीप्रेमी अविरत धडपडत आहेत. सुरेश गंगाखेडकर असे या मराठीच्या खंद्या प्रचारकाचे नाव असून अनुवादकार्य, काव्यमंडळे अशा उपक्रमांतून त्यांनी देशभरात मराठी भाषेची पताका फडकत ठेवण्याचे प्रयत्न चालविले आहेत. यापुढेही मराठी साहित्य प्रचाराची ही चळवळ अविरत सुरू ठेवण्याचा मानस गंगाखेडकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.१९३८ साली हैदराबादमध्ये जन्मलेल्या सुरेश यांनी मराठीतील यशवंत मनोहर, कुसुमाग्रज, विंदा आदी दिग्गजांच्या कवितांची माहिती अन्य भाषिकांना व्हावी यासाठी त्यांच्या कविता हिंदी भाषेत, त्यात वृत्त आणि काव्य प्रकारात अनुवादित केल्या. या कविता हैदराबाद येथून प्रसिद्ध होणाºया ‘गोवळकोंडा दर्पण’ या मासिकातून नियमित प्रकाशित होत असत. तेलुगू विद्यापीठाचे कुलगुरू एन. गोपी यांच्या ‘नानीलू’ या काव्यसंग्रहाचा त्यांनी ‘मुक्तकणिका’ नावाने मराठीत अनुवाद केला. तो मराठी साहित्य परिषदेच्या हैदराबाद शाखेकडून २ वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आला आहे.हैदराबादमधील मराठी कवी-साहित्यिकांची मोट बांधून गंगाखेडकर यांनी ‘काव्यसंध्या’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत तेथील नव्या मराठी कवी-साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरमहिन्याला बैठकीचे आयोजन करण्यात येते.पेशाने वास्तुविशारद असलेल्या गंगाखेडकर यांनी काही वर्षे हिमाचल प्रदेश शासनाच्या नगरविकास विभागात नोकरी केली. या काळात ते तेथील महाराष्टÑ मंडळाचे सरचिटणीस म्हणून काम पाहत. हिमाचलमध्येही मायमराठीच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबविले.भाषेबरोबरच रांगोळी आणि चित्रकलाही त्यांना अवगत आहे. सर्वप्रथम रांगोळीतून चित्र साकारण्याचा प्रयोग त्यांनी १९५२ साली हैदराबादेत केला. तसेच विविध विषयांवरील चित्रे आणि त्यांना साजेशा स्वरचित काव्यपंक्ती असे अभिनव चित्रप्रदर्शनही त्यांनी अनेक ठिकाणी भरविले आहे.सध्या नागपुरात वास्तव्यास असलेल्या गंगाखेडकर यांची साहित्य-कलासाधना अविरत सुरू आहे.

टॅग्स :मराठी भाषा दिन 2018