Join us  

सोशल मीडियावर होतोय ‘साहित्याचा जागर’;ऑनलाइन व्याख्याने, कवी संमेलनांची रंगते मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 2:37 AM

उदयोन्मुख साहित्यिकांना मिळतंय व्यासपीठ

- स्वप्निल कुलकर्णी मुंबई : माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोशल मीडियामुळे आज जागतिक स्तरावरील मराठी जन एकत्र बांधला गेला असून मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे. सोशल मीडिया म्हणजे करमणूक अथवा वेळ घालविण्याचे साधन नाही, तर या माध्यमामुळे उत्तम मूल्यनिर्मिती, समृद्ध विचार आणि विविध विषयांची सकारात्मक चर्चा होत असल्याचे कोरोनाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनमध्ये दिसत आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये फेसबुक, यू ट्युबसारख्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आॅनलाइन व्याख्याने, कवी संमेलने, एवढेच काय तर जात्यावरच्या ओव्यादेखील ऐकायला मिळत आहेत. सोशल मीडियाची ही सकारात्मक बाजू खऱ्या अर्थाने या ‘लॉकडाउन’मुळे समोर येताना दिसत आहे. घरकोंडीमध्ये सोशल मीडियावर सुरू झालेल्या ‘साहित्याचा जागर’मुळे कंटाळवाण्या झालेल्या ‘लॉकडाउन’मध्ये ही गोष्ट मराठी रसिकांना नक्कीच सुखावणारी आहे.

घरकोंडीचा सदुपयोग करण्यासाठी अनेक जण सोशल मीडियाचा आधार घेताना दिसत आहेत. यामध्ये लेखक, कवी, ब्लॉगर्स आदी मंडळी आघाडीवर दिसत आहेत. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करीत सुरू झालेल्या साहित्याच्या जागराला सोशल मीडियामधून तितकाच चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी सोशल मीडिया हे पूरक व्यासपीठ आहे.

सोशल मीडियात क्रांती झाल्यावर तरुणाईचा पुस्तकांशी येणारा संबंध कमी येईल, असे अनेक मतप्रवाह होते. मात्र हे सर्व समज मागे टाकत तरुणाईने या लॉकडाउनच्या काळात नव्या स्टाईलने, आगळ्यावेगळ्या ढंगात सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरून व्यक्त व्हायला, लिहायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरील ‘युथ’च्या या लेखनाला आणि सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

फेसबुक, ब्लॉगसारख्या जनमाध्यमावर अनेक कल्पक तरुण विविध विषयांवर वेगवेगळ्या शैलीत, थेट लिखाण करीत आहेत. तसेच विविध किस्से, कथा-कविता, ललित, प्रवासवर्णने, राजकीय-सामाजिक घडामोडी अशा विविध विषयांवर युवा लेखक, कवी लिहिते होत आहेत. सोशल मीडियाचे क्षेत्र येत्या काळात अधिक विस्तारले जाणार असून अभिव्यक्तीच्या माध्यमाबरोबरच दर्जेदार लिहिणाºया नवलेखकांसाठी येणाºया काळात रोजगार व प्रसिद्धीचे नवे अवकाश प्राप्त करून देणारे क्षेत्र ठरणार आहे.

मुके ओठ बोलके झाले!सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्याचे खरे सामर्थ्य या घरकोंडीत सर्वांना समजले ही समाधानाची गोष्ट आहे. आतापर्यंत हा सोशल मीडिया दुसºयाचे ऐकण्यासाठी वापरला जायचा. या घरकोंडीत चांद्यापासून बांद्यापर्यंत ग्रामीण भागात असणारे मुके ओठ बोलू लागले याचा मनस्वी आनंद होतोय. आता त्या कवितांचा, विचारांचा दर्जा काय आहे तो विचार करण्याची ही वेळ नाही. तर व्यक्त होणे आज महत्त्वाचे आहे असे वाटते.- प्रवीण दवणे, लेखक, गीतकार

प्रत्येकाच्या हातात अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल आल्याने फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स अशा सर्वच माध्यमांवर तरुणाई ‘अ‍ॅक्टिव्ह’ दिसते. सोशल मीडियावर मुक्तहस्ते लेखन करण्याची मुभा मिळाल्याने तरुणाई साहित्यातील विविध प्रकारांत लेखन करीत आहे. यामध्ये कथा, पुस्तक परीक्षण, कविता, प्रवासवर्णन, रोजच्या आयुष्यातील आलेले अनुभव, व्यक्तीचित्रे, स्फुटलेखन, खाद्य संस्कृती, परंपरा, तरुणाईच्या समस्या, तंत्रज्ञानाचे नवे बदल असे विषय हाताळले जात आहेत.

यामध्ये विशिष्ट धाटणीचे लिखाण करण्यावर तरुणाईचा अधिक भर असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय कविता, व्याख्याने यांचे सादरीकरण होत आहे. तरुणाईच्या दैनंदिन आयुष्यात झालेले बदल त्यांच्या कवितेमधून उतरत आहेत. त्या अनुभवांची मांडणी करून लवकरात लवकर हजारो जणांपर्यंत पोहोचवण्याची सोय उपलब्ध झाल्याने लिहिणाऱ्यांच्या आणि व्यक्त होणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस