Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित्त दिंडोशीत साजरा होतोय 'साहेब उत्सव!

By मनोहर कुंभेजकर | Updated: January 21, 2024 16:56 IST

८० टक्के समाजकरण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकाना दिली.

मुंबई - ८० टक्के समाजकरण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकाना दिली. मंगळावर दि,२३ जानेवारीला शिवसेनाप्रमुखांची जयंती आहे. 

यानिमित शिवसेना नेते, दिंडोशी विधानसभा मतदार संघाचे आमदार, विभागप्रमुख व माजी महापौर सुनील प्रभू यांनी रविवार दि, १५ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत "साहेब उत्सवाचे" आयोजन केले आहे. शिवसेनाप्रमुखांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतांना शिवबंधन सप्ताह देखिल साजरा होत आहे.

प्रती वर्षा प्रमाणे या वर्षी देखील हा पंधरवडा संस्कार आणि संस्कृतीची जपणूक करण्यासाठी साजरा केला जाणार असून या उत्सवातून शिवसेना एकात्मता आणि संस्कृतीचे जतन करण्याची शिकवण पुढच्या पिढीला देते अशी माहिती त्यांनी दिली.    

 या साहेब उत्सव २०२४ च्या निमित्त दिंडोशी विधानसभा क्षेत्रात संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विविध योजना व पेन्शन धारकांना आदेशपत्र व ओळखपत्र वाटप, ३५०० विद्यार्थांना १० वी परीक्षा सराव प्रश्न संच वाटप, सार्वजनिक व घरगुती गणेश स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम, अपंग व्यक्तीना व्हील चेअर वाटप, कबड्डी व क्रिकेट स्पर्धा, आयुष्यमान व आधार कार्ड कॅम्प, रक्तदान शिबीर, जेष्ठ नागरिक देवदर्शनाला,जेष्ठ नागरिक कार्ड वाटप, चित्रकला स्पर्धा,आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर असे अनेक समाज हितोपयोगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली.