मुंबई : मालाड (प.) विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन होणार असून येथील शिवसेनेचे उमेदवार डॉ. विनय जैन शिवसेनेचा भगवा फडकवतीलच, असा विश्वास शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला. मालाड मतदारसंघाचा मतदारांना अपेक्षित असलेला विकास करतील, असा ठाम विश्वासदेखील रामदास कदम यांनी जैन यांच्यासाठी आयोजित जाहीर सभेत व्यक्त केला. मालाड (प.) येथील त्रिमूर्ती सोसायटीजवळील दयानंद प्राथमिक शाळेच्या मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विनय जैन हे सर्व जाती-धर्मांचा आदर करणारे स्थानिक नेतृत्व आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉ. विनय जैन यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली असून विद्यादानासारखे पवित्र कार्य ते करत असल्याबद्दल कदम यांनी गौरवोद्गार काढले. या वेळी डॉ. विनय जैन यांनीदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या संधीचे सोने करून मतदारांना अभिप्रेत असलेला सर्वांगीण विकास साधणारच, असा ठाम विश्वासदेखील व्यक्त केला. या वेळी उपविभागप्रमुख अशोक पटेल, उपविभागप्रमुख अनिल भोपी, नीलाताई देसाई, महिला उपविभाग संघटक गीता भंडारी व तनुजा म्हात्रे, नगरसेविका अनघा म्हात्रे, नगरसेवक अजित भंडारी यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
मालाडमध्ये भगवा फडकणार
By admin | Updated: October 9, 2014 01:55 IST