Join us  

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चर्चगेट स्टेशनवरील महात्मा गांधीजींचे चित्र काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 3:37 AM

चर्चगेट येथे अ‍ॅल्युमिनिअमचे चौकोनी ६ भाग पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता.

मुंबई : चर्चगेट येथे अ‍ॅल्युमिनिअमचे चौकोनी ६ भाग पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने या इमारतीचे स्ट्रक्टरल आॅडिट तयार केले. यामध्ये इमारतीवरील ८० फूट महात्मा गांधीचे चित्र धोकादायक असल्याने हे चित्र काढण्याचा निर्णय घेतला. वारा आणि पावसामुळे धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव चित्र काढण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.चर्चगेट स्थानकाच्या रेल्वेच्या इमारतीचे सुशोभीकरणासाठी महात्मा गांधीचे चित्र लावण्यात आले होते. मात्र, १२ जून रोजी पाऊस आणि वादळामुळे गांधीजींचे चित्र असलेले अ‍ॅल्युमिनिअमचे चौकोनी बॉक्स कोसळून दुर्घटना घडली. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा अशी दुर्घटना घडू नये, यासाठी गांधीजींची प्रतिमा काढण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गांधीजींची प्रतिमा काढण्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले. बुधवारपर्यंत हे काम ७० ते ८० टक्के पूर्ण झाले.वारा आणि पावसामुळे चित्राच्या फसाडामधील ६ भाग कोसळले. यामधील एक भाग प्रवासी मधुकर नार्वेकर यांना लागून मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांना पश्चिम रेल्वे प्रशासनाने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली. यामध्ये चित्रांचे फसाड कमकुवत आणि धोकादायक असल्याने चित्र काढण्याचानिर्णय घेतला आहे, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.आॅक्टोबर, २०१७ रोजी चर्चगेट स्थानकाच्या इमारतीचे रंगकाम करण्यात आले होते. यावेळी एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ब्राझीलचा स्ट्रीक आर्टिस्ट एडुआर्डो कोबरा याने इमारतीवर महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटले होते. सामाजिक दायित्व निधी २५ लाख रुपये खर्च महात्मा गांधी यांचे चित्र रेखाटण्यात आले होते. २०१२ साली हे अ‍ॅल्युमिनियमच्या वापर करून चौकोनी भाग बनविण्यात आले. या ८० फूट कलाकृतीला पाहण्यासाठीअनेक देशी, परदेशी पर्यटक येत असायचे.स्ट्रक्चर आॅडिटमध्ये अ‍ॅल्युमिनिअमचे फसाड कमकुवत असल्याने वादळ वाºयात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव महात्मा गांधीजींची प्रतिमा काढण्यात येत आहे. ही प्र्रतिमा कुठे लावायची याचा निर्णय तुर्तास घेण्यात आला नाही.- रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

टॅग्स :मुंबई