Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयांची सुरक्षा टांगणीला

By admin | Updated: September 1, 2015 01:37 IST

राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयांपैकी १५ वैद्यकीय महाविद्यालयांनी सुरक्षा अहवाल सादर केला आहे. या अहवालातून १५ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये

मुंबई : राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयांपैकी १५ वैद्यकीय महाविद्यालयांनी सुरक्षा अहवाल सादर केला आहे. या अहवालातून १५ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ८२२ सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूणच परिस्थितीचा विचार करता, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची सुरक्षा टांगणीलाच असल्याचे चित्र आहे.काहीवेळा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यावर नातेवाइकांचा जमाव डॉक्टरांना मारहाण करतो किंवा रुग्णालयाची तोडफोड केली जाते. अशा घटना राज्यात वारंवार घडत आहेत. डॉक्टरांना काम करताना सुरक्षित वाटावे म्हणून रुग्णालयातील सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी मार्ड वारंवार करते आहे. यावर उपया शोधण्यासाठी सद्य:स्थितीला महाविद्यालयात किती सुरक्षारक्षक आहेत, किती सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे, याचा आढावा घेण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. २५ जुलैपर्यंत सुरक्षा अहवाल वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाकडे सादर करायला सांगितला होता. पण, मुदत संपून एक महिना उलटूनही अनेक महाविद्यालयांनी अहवाल सादर केला नव्हता. यामुळे तावडे यांनी महाविद्यालयांना १ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या मुदतवाढीत १५ महाविद्यालयांनी अहवाल सादर केला. ३ जुलैला मार्डने सुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी मासबंक केला होता. लिखित स्वरूपात मागण्या मान्य झाल्यावर मार्डने संप मागे घेतला होता. पण, सोलापूर येथे शनिवारी पुन्हा निवासी डॉक्टरला मारहाण झाली. या प्रकरणानंतर मार्डने पुन्हा एकदा सरकारशी चर्चा केली. यानंतर महाविद्यालयांनी सुरक्षा अहवाल मागवला. सुरक्षारक्षक कधी तैनात होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. (प्रतिनिधी)