Join us  

धोकादायक कारखान्यांचे होणार सेफ्टी ऑडिट; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 2:04 AM

तारापूर स्फोटाचा गुन्हा दाखल नाही

मुंबई/बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीत घडलेल्या स्फोटासारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्व धोकादायक कारखान्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. दरम्यान, या स्फोटाबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत ही पाहणी करावी, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घेतलेल्या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजय मेहता उपस्थित होते. औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य देत अशा घटना घडणार नाहीत, यादृष्टीने कठोरपावले उचलावी, असे निर्देश या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी प्रधान सचिव (कामगार) करणार असून त्यात जबाबदारीही निश्चित करण्यात येईल. यापूर्वी डोंबिवली येथे प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. अशा स्वरूपाच्या घटना घडून औद्योगिक सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. कारण अस्पष्टच बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एएनके फार्मा या रासायनिक कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटानंतर तिसऱ्या दिवशीही या प्रकरणी बोईसर पोलीस स्थानकात कोणावरही गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. या भीषण स्फोटातील सात गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.

या घटनेची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे चौकशी होणार आहे. या संचालनालयाच्या अहवालानंतरच पोलीस गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी घटनेचा अहवाल मिळावा, म्हणून बोईसर पोलिसांनी संबंधित विभागांना पत्रही दिले आहे. पण अहवाल मिळालेला नाही. ज्या कारखान्याच्या इमारतीमध्ये हा स्फोट झाला, तेथे बांधकाम सुरू असतानाच रासायनिक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तसेच तेथे दोन कुटुंबेही राहत होती. त्यामुळे अनेक नियम धाब्यावर बसवल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :स्फोट