मुंबई : डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर जाग आलेल्या पालिकेने कर्मचारी वसाहतींकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार घनकचरा व्यवस्थापनाच्या अखत्यारितील ११ वसाहतींना अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आले आहे़ मात्र त्यांच्या पुनर्वसनाबाबत कोणतीही योजना स्पष्ट करण्यात आलेली नाही़डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत ६१ जणांचा मृत्यू झाला़ या दुर्घटनेनंतर ३० वर्षांवरील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट सक्तीचे करण्यात आले़ त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या ३० वर्षांवरील इमारती तसेच ३० वर्षांखालील मात्र सकृतदर्शनी धोकादायक असलेल्या इमारतींची स्थैर्यता तपासणी सल्लागारांमार्फत करण्यात आली़ त्यानुसार ११ कर्मचारी सेवानिवासस्थाने सी-१ श्रेणी म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत़ या वसाहती अतिधोकादायक असल्याने राहण्यास योग्य नाही़ त्यामुळे येथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे आवश्यक आहे़ मात्र पालिकेने या वसाहतींची यादी जाहीर करताना त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीच योजना स्पष्ट केलेली नाही़ (प्रतिनिधी)
सफाई कामगारांच्या वसाहती धोकादायक
By admin | Updated: June 19, 2015 03:07 IST