Join us

वाडियात उमटताहेत सयामी जुळ्यांची पावले

By admin | Updated: May 9, 2015 03:37 IST

कमरेपासून चिकटून जन्माला आलेल्या दोन मुली म्हणजे हा अमानवी, भयकारी प्रकार आहे. अशा मुली जन्माला आल्यानंतर त्यांना मारून

मुंबई : कमरेपासून चिकटून जन्माला आलेल्या दोन मुली म्हणजे हा अमानवी, भयकारी प्रकार आहे. अशा मुली जन्माला आल्यानंतर त्यांना मारून टाकले पाहिजे, असा विचार पवार कुटुंबीयांनी केला. पण, वैद्यकशास्त्राप्रमाणे अशी मुले जन्माला येतात, त्यांना वेगळे करता येते अशी समजूत काढून प्रथम संस्थेने या सयामी जुळ्या मुलींना दोन वर्षांपूर्वी वाडिया रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रिया करून वेगळे केलेल्या या सयामी जुळ्या रिद्धी आणि सिद्धीचे सध्या वाडिया रुग्णालय हेच घर बनले आहे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, आयाबाई, कर्मचारी त्यांचे कुटुंब झाले. शुक्रवारी वाडिया रुग्णालयात या रिद्धी -सिद्धीचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. पनवेल येथे बिगारी काम करणाऱ्या पवार दाम्पत्याला ६ मे २०१३ रोजी जुळ्या मुली झाल्या. पण, या दोन मुली कमरेखालून चिकटलेल्या होत्या. देवीचा कोप झाला या भावनेतून त्यांना मारून टाकण्याचा विचार त्यांनी केला होता. या वेळी प्रथम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना परळच्या वाडिया रुग्णालयात आणले. पहिले तीन महिने या मुलींना अतिदक्षता विभागातच ठेवण्यात आले. यानंतर १७ जानेवारी २०१४ ला त्यांच्यावर २० तास शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळे करण्यात आले. या मुलींचीे चांगली प्रगती होते आहे, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. त्यांचे आई-बाबा त्यांना पाहायला येत नाहीत. रिद्धी-सिद्धीच्या वाढदिवसाला अभिनेत्री तारा शर्मा उपस्थित होती. (प्रतिनिधी)