Join us  

वाझेनेच प्रदीप शर्माला दिली हिरेनच्या हत्येची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 7:15 AM

एनआयएचा दावा, एनआयएने अँटालिया स्फोटके प्रकरणी दाखल केलेल्या १० हजार पानी आरोपपत्राला साक्षीदारांच्या जबाबांचीही प्रत जोडण्यात आली आहे.

ठळक मुद्देपरमवीर सिंह यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्या विरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमवीरसिंग यांना वाचवण्यासाठी एनआयएने त्यांना आश्वासित केले. त्यामुळे त्यांच्या चार्जशीटमध्ये परमवीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही

मुंबई : ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याला पैसे दिल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्रात केला आहे.

एनआयएने अँटालिया स्फोटके प्रकरणी दाखल केलेल्या १० हजार पानी आरोपपत्राला साक्षीदारांच्या जबाबांचीही प्रत जोडण्यात आली आहे. हिरेन कसा दिसतो, हे दाखवण्यासाठी सचिन वाझे याने २ मार्च रोजी हिरेन यांना एका बैठकीत बोलावले. त्या बैठकीत प्रदीप शर्मा, सुनील माने हे उपस्थित होते.हिरेन यांची हत्या करण्याचे काम प्रदीप शर्मा यांच्यावर सोपावण्यात आले होते. शर्मा यांनी याबाबत संतोष शेलारकडे विचारणा केली आणि त्याने हिरेन यांची हत्या करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर वाझे पुन्हा शर्माला भेटला आणि त्याला या हत्येसाठी खूप मोठी रक्कम दिली, असा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

हत्येपूर्वी वाझे याने पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हिरेन यांना भूमिगत होण्यास तयार केले. त्यानंतर हिरेन यांनी अधिकाऱ्यांना ठाण्यातील घोडबंदर येथील सूरज वॉटर पार्कजवळ भेटण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, माने याने हिरेन यांना बरोबर घेऊन त्यांचा ताबा शेलारकडे दिला. शेलार, मनीष सोनी, सतीश मोटकरी आणि आनंद जाधव हे त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यानंतर या सर्वांनी हिरेन यांची हत्या करून मृतदेह ठाणे खाडीजवळ टाकला. दुसऱ्या दिवशी हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना सापडला, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

अनिल देशमुखांच्या विरोधात कटकारस्थानnपरमवीर सिंह यांच्या माध्यमातून अनिल देशमुखांच्या विरोधात घटनाक्रम घडवण्यात आला आहे. परमवीरसिंग यांना वाचवण्यासाठी एनआयएने त्यांना आश्वासित केले. त्यामुळे त्यांच्या चार्जशीटमध्ये परमवीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. nत्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना केला.                     

टॅग्स :सचिन वाझेमनसुख हिरण