Join us

सचिन पिळगावकर, जयंत सावरकर यांना जीवनगौरव

By admin | Updated: December 28, 2016 03:36 IST

जागतिक मराठी अकादमी व श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) मुंबई आयोजित ‘शोध मराठी मनाचा...’ - २०१७ हे १४वे जागतिक मराठी संमेलन ७ व ८ जानेवारी २०१७ रोजी मुंबईत

मुंबई : जागतिक मराठी अकादमी व श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) मुंबई आयोजित ‘शोध मराठी मनाचा...’ - २०१७ हे १४वे जागतिक मराठी संमेलन ७ व ८ जानेवारी २०१७ रोजी मुंबईत शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे. या समारंभास ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर (चित्रपट) व जयंत सावरकर (रंगभूमी) यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अमेरिका येथील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश राचमाले यांची निवड झाली आहे. या संमेलनाचे उद्घाटन जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. या संमेलनात जगातील व भारतातील कर्तृत्ववान मराठी माणसांच्या मुलाखती आयोजित केल्या असून, हे संमेलन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. ‘शोध मराठी मनाचा...’ - २०१७ हे जागतिक मराठी संमेलन चित्रपट, रंगभूमी, कला, साहित्य, क्रीडा आणि ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यावर आधारित असून, या संमेलनात अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, इस्रायल, कतार, लंडन, यूके इत्यादी देशांतील लोक यात सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना निमंत्रित केले आहे, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली. (प्रतिनिधी)