मुंबई : सचिन ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक सचिन जकातदार यांचे बुधवार, ८ जुलैला जे.जे. रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. उद्या गुरुवारी भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सचिन यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना २५ मे रोजी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सचिन यांना अर्धांगवायू झाला होता. अर्धांगवायूमुळे त्यांचे दोन्ही हात, पायांची हालचाल होत नव्हती. त्यांच्या मणक्याला दुखापत झाल्यामुळे मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण यानंतर त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. उपचारादरम्यान बुधवारी दुपारी २ वाजता सचिन यांचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. सचिन यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे त्यांना डायलेसिसवर ठेवण्यात आले होते. किडनी निकामी झाल्याचा परिणाम फुप्फुसावरही झाल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. गेल्या चार दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, अशी माहिती त्यांचे वडील प्रमोद जकातदार यांनी दिली. गुरुवार, ९ जुलैला सायंकाळी ६.३० वाजता शिवाजी पार्क येथील साने गुरुजी विद्यालयापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कंपनीकडून सांगण्यात आले. सचिन ट्रॅव्हल्सने पर्यटकांना लकी ड्रॉ योजना उपलब्ध करून दिली होती. पण या ड्रॉमध्ये अनेक पर्यटकांची फसवणूक झाल्याचा आरोप पर्यटकांनी केला होता. या प्रकरणी ८५ पर्यटकांनी ८५ लाखांपर्यंतची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. त्यात शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते. तब्येत बिघडल्याने त्यांना जे.जे.मध्ये हलवण्यात आले होते. (प्रतिनिधी)
सचिन जकातदार यांचे निधन
By admin | Updated: July 8, 2015 22:00 IST