Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सार्क’ला पर्याय शोधायला हवा - उपराष्ट्रपती अन्सारी

By admin | Updated: December 29, 2016 01:37 IST

दक्षिण आशियायी देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘सार्क’ परिषदेचा प्रयोग फसला आहे. सार्क संघटनेला पर्याय म्हणून भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश आदी देशांची नवी आघाडी

मुंबई : दक्षिण आशियायी देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘सार्क’ परिषदेचा प्रयोग फसला आहे. सार्क संघटनेला पर्याय म्हणून भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश आदी देशांची नवी आघाडी तयार करण्याची आवश्यकता आहे. मात्र, ही आघाडी व्यावहारिक दृष्टीकोनातून व्हायला हवी. या तिन्ही देशांची जी नवी आघाडी बनेल ती स्वखुशीने असावी, यात कोणत्याही प्रकारची सक्ती नसावी, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले.उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते पत्रकार सुधींद्र कुलकर्णी लिखित ‘आॅगस्ट व्हाइस : व्हॉट दे सेड आॅन १४-१५ आॅगस्ट १९४७’ या पुस्तकाचे बुधवारी प्रकाशन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस्मध्ये झालेल्या या सोहळ्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, अंजुमन इस्लामचे अध्यक्ष जहीर काझी, धवल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपराष्ट्रपती अन्सारी म्हणाले की, दक्षिण आशियायी देशांनी विशेषत: भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांनी संरक्षण आणि सुरक्षाविषयक पारंपरिक दृष्टीकोन बदलायला हवा. अलीकडच्या काळात मानवी सुरक्षेकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे मानवी सुरक्षेचा प्रामुख्याने विचार करणारे आणि मानवी चुका ध्यानात घेणारे धोरण आखायला हवे. यापुढे मुक्त व्यापार आणि व्यवहारावर अधिक भर द्यायला हवा. ऐतिहासिक, सांस्कृतिक एकजिनसीपणा नव्या पिढीपर्यंत पोहचायला हवा. सुधींद्र कुलकर्णी यांनी आपल्या पुस्तकातून १४-१५ आॅगस्ट १९४७ रोजी विविध नेत्यांनी केलेली वक्तव्ये, लिखाण आणि कृतींचा धांडोळा घेतल्याचे उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केले.तर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात एक प्रकारची सांस्कृतिक, ऐतिहासिक समानता आहे. त्यामुळे या देशांनी आपले स्वातंत्र्य राखून एकत्र यायला हवे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या तिन्ही देशांची आघाडी नक्कीच फायदेशीर ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिन्ही देशांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पाकिस्तानशी संवाद वाढला पाहिजे. पण, समाजातील काही घटकांना पाकिस्तानशी संवाद नको आहे. पाकिस्तानशी संवाद साधू पाहणाऱ्यांना ‘देशविरोधी’ ठरविले जाते, असे सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)