Join us

चित्र पाहण्याचा पहिला मान आमचा...

By श्रीकिशन काळे | Updated: July 29, 2024 11:36 IST

अशा भावना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या कन्या लीना गोगटे यांनी व्यक्त केल्या.

लीना गोगटे (शब्दांकन : श्रीकिशन काळे)

‘बाबा खूप मोठे व्यंगचित्रकार असले, तरी ते लहानपणापासून आईला, आम्हा दोघी बहिणींना त्यांनी काढलेले चित्र दाखवत. कसे झालेय चित्र, असेही ते विचारत. त्यांचे चित्र पाहण्याचा पहिला मान त्यांनी आम्हाला दिला. प्रत्येक काढलेले चित्र ते आम्हाला दाखवत. आम्ही त्या चित्रात काही सुचवलं, तर ते आनंदाने स्वीकारत. हिला काय कळतंय ! असे ते कधीच बोलत नसत, एवढे ते साधेसुधे आणि प्रेमळ, मृदू स्वभावाचे आहेत,’ अशा भावना ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या कन्या लीना गोगटे यांनी व्यक्त केल्या.

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मला सर्व आठवतं. तब्बल ६३ ते ६४ वर्षांच्या आठवणी आहेत. खूप वेगळं काही वाटायचे नाही, कारण बाबांना हेच काम करताना लहानपणापासून पाहिले आहे. थोडं मोठं झाल्यावर कळलं की, ते किती मोठे कलाकार आहेत. मोठे कलाकार असले, तरी त्यांचा स्वभाव खूप शांत आहे. ते कधीही रागावले नाहीत, ओरडले नाहीत.  चित्र काढणे हा त्यांचा व्यवसाय होता. हर तऱ्हेची लोकं त्यांना भेटली. काही फसवणारी मंडळीही होती; पण त्यांच्यावरही ते कधी चिडले नाहीत. कलाकार म्हणून लहरीपणा त्यांच्यात कधीच आला नाही. चित्रांतून लोकांना जसे ते हसवतात, तसेच ते प्रत्यक्ष जीवनातही आहेत. हसत खेळत राहणारे.  कोणतीही घटना घडली, तर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ते पुढे जातात. एवढ्या मोठ्या कलाकाराची मुलगी, तर मी कला विद्यालयात जायला पाहिजे, अशी सक्ती त्यांनी केली नाही. मला कॉमर्सला जायचे होते. मी तिकडेच गेले. आईकडूनही सक्ती नव्हती. माझ्या धाकट्या बहिणीने चित्रकलेचे शिक्षण घेतले व त्यात ती काम करते. मी २००४ मध्ये त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरविण्याचा हट्ट केला. घरात एखादं कार्य उभं राहिलं की, तसाच व्याप चित्रप्रदर्शन भरवताना असतो. त्यांनी अगोदर कशाला प्रदर्शन भरवायचे, नको म्हणून सांगितले होते. पण, मी हट्ट धरला. यापूर्वी कधीच कोणत्या गोष्टीचा हट्ट आम्ही दोघी मुलींनी केला नाही. त्यामुळे हा हट्ट बाबांनी पूर्ण केला. प्रदर्शन भरवलं. त्यासाठी बाबांनी आम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केलं, तेव्हाही ते खूप यशस्वी झाले. अक्षरश: रांगा लागल्या होत्या. एक महिला व्हिलचेअरवरून आलेली. छोटी मुलं आली होती.

विशेष म्हणजे मूकबधीर मुलांचा एक ग्रुप आला होता. त्यांना ती चित्रं कळत होती. तो अनुभव खूप अविस्मरणीय ठरला.  बाबा सतत कामात असायचे. ते खूप काम करायचे. पण, काम करताना घरात ते कसेही राहत नसत. त्यांचे कपडे छान असतात, त्यांचं वागणं मृदू आहे. मोठ्या क्षेत्रातील लोकं घरात यायची. सुभाषनगरमधील घरात त्यांची एक खास खोली असायची. त्यात ते काम करायचे. 

बाबा काम करताना आम्हाला कधी ओरडले नाहीत, कारण आम्ही लहानपणापासून त्यांचे काम पाहत आलो आहोत. त्यांच्या खोलीचे दार कायम लोटलेले असायचे. त्या खोलीकडे आम्ही जायचो नाही. आईने तसे वळणच लावलेले. आम्ही कधी आरडाओरडदेखील केला नाही.  बाबांची एक विशेष गोष्ट सांगते. त्या काळात पुण्यामध्ये प्रदर्शनासाठी वेगळी आर्ट गॅलरी नव्हती. एकही कलादालन नव्हते. बालगंधर्व कलादालन नंतर झाले. त्यापूर्वी प्रदर्शन भरवताना चित्रं कुठे टांगायची, असा प्रश्न असायचा. मग, मांडव वाल्याच्या कापडावर चित्रं बांधावी लागायची. ही अडचण बाबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एक स्क्रीनचे युनिट तयार केले. अगोदर लाकडाचे खूप जड झाले, मग त्यांनी बदल करून खूप हलकं मॉडेल तयार केलं. ते दिसायलाही खूप छान झाले. ते एवढं हलकं बनवलं की, कोणीही ते सहज उचलेल. ते उचलून दुसरीकडे नेऊन त्यावर चित्रं लावता येत. त्याला मग नंतर खूप मागणी झाली, कारण त्यांचे ते युनिक काम होतं. देखणं होतं. त्यांची सर्व मेहनत त्यामध्ये होती.  

रंगमंचावर चित्र काढताना बाबांच्या मागे असलेल्या प्रेक्षकांना ते दिसायचे नाही. त्यामुळे त्यांनी चित्र काढण्यासाठी बोल्ड ब्रश तयार केला. त्यामुळे चित्रातील रेषा ठसठसीत उमटायच्या. त्यासाठी खास ड्राॅइंग बोर्ड तयार करून घेतला होता. त्यांना तांत्रिक गोष्टींची माहिती होती. त्यांनी हलती-डोलती चित्रंदेखील काढली. दात घासणारी बाई. त्यात तो ब्रश मागे पुढे व्हायचा. या वस्तू त्यांची खास निर्मिती होती. जाणकारांनी या गोष्टींचेही खूप कौतुक केले. 

बाबांचे पुण्यामध्ये सुभाषनगरमधील घर हे १९५५ पासूनचे आहे. ते अजूनही तसेच आहे. तिथे आता कधीकधी जातात. त्यांच्या सर्व आठवणी त्या घरात आहेत. आम्ही ते घर आजही तसेच ठेवलेय. बाबा शंभरीत पदार्पण करताहेत. आता ते आराम करतात.  केवळ दिवाळी अंकासाठी चित्रे काढतात. मोहिनी अंकासाठी ते गेली ७३-७४ वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्यासाठीही चित्रे काढून देतात. बाबांमध्ये निरागस कुतूहल आजही कायम आहे. तेच त्यांच्या चित्रांमध्ये उतरतं आणि मग सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं.    

टॅग्स :मुंबई