Join us

'रस्टिक ऱ्हाप्सोडी'चे कलाप्रेमींना आकर्षण

By संजय घावरे | Updated: October 23, 2023 19:43 IST

जहांगीर आर्ट गॅलरीत गोव्याच्या लोक जीवनाचे मोहक चित्रमय दर्शन

मुंबई- गोवा येथील चित्रकार मोहन नाईक यांच्या 'रस्टिक ऱ्हाप्सोडी' हे चित्र प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात कलाप्रेमींना गोव्याच्या लोक जीवनाचे मोहक दर्शन घडत आहे.

२३ ऑक्टोबरपासून सुरू झालेले हे प्रदर्शन २९ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. 'रस्टिक ऱ्हाप्सोडी : अॅन ओड टू गोवाज व्हिलेज लाईफ'मध्ये रसिकांना गोव्याच्या ग्रामीण जीवन पाहायला मिळत आहे. अनेकदा आपल्यासमोर गोव्याचे चित्र हे बीच आणि पार्टी एवढेच मर्यादित असते, पण या वरवरच्या चित्रापलीकडे अद्भुत आणि संपन्न अशा निसर्गाने नटलेला ग्रामीण गोवा वसलेला आहे. या ग्रामीण गोव्यातील निसर्ग आणि तिथल्या माणसांच्या साध्या सोप्या जीवनाचे दर्शन या प्रदर्शनात घडते. नाईक यांची चित्रे म्हणजे पशुधन आणि मानवी जीवन यांच्या समरसतेचा सुरेख मिलाफ आहे. एक वेगळाच गोवा या प्रदर्शनात रसिकांना पहायला मिळत आहे.

मोहन नाईक यांची विशिष्ट शैली आणि त्यांच्या कलाकृतीतून गोव्यातील माणसांची, तिथल्या निसर्गाची  गोष्ट सांगण्याची हातोटी यामुळे ही चित्रे देखणी भासतात. या  चित्रांमध्ये केवळ सौंदर्याची अनुभूतीच होत नाही, तर हळूहळू मनुष्य निसर्गापासून आणि गावाच्या निरागस जीवनशैलीपासून दुरावत चालल्याची जाणीव होते. त्यामुळे एकाचवेळी सौंदर्य दर्शन आणि जीवनाचा संगम या चित्रांमध्ये घडल्याचे जाणवते. नाईक यांनी आकर्षक रंगांचा वापर करून कलाकृतीला खुलवल्या आहेत. मानवी आकृत्यांची प्रमाणबद्धता, चित्रकृतींची लयबद्धता हि या चित्रांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.  

मोहन नाईक यांनी १९८९ मध्ये गोवा कॉलेज ऑफ आर्ट, बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट्सचे शिक्षण  पूर्ण  केले.  शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुठलाही समांतर व्यवसाय न करता त्यांनी पूर्ण वेळ चित्रकार म्हणून काम सुरू केले. तीन दशकांपासून चित्रकार म्हणून मोहन नाईक यांनी देश विदेशात आपली ओळख यशस्वीपणे तयार केली आहे. त्यांच्या  वैशिष्ट्यपूर्ण कला शैलीमुळे अल्पावधीतच ते चित्रकार म्हणून  झाले. मोहन नाईक यांनी चित्रशैली ही वास्तववादी आणि आधुनिक चित्रशैली यांचा सुरेख संगम आहे. त्यांची देश आणि परदेशात आयोजित झालेल्या अनेक चित्र प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला आहे. ज्यामध्ये द फ्लाइंग डचमन, गॅलेरिया रॅलिनो आणि गोव्यातील आर्ट चेंबर यासारख्या महत्वपूर्ण प्रदर्शनाचा सहभाग आहे. ऑक्सफर्ड इंडिया लिमिटेड आणि क्राई आर्चिस लिमिटेड या संस्थेतर्फे त्यांना  चित्रकलेतील कार्यासाठी गौरवण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबईगोवा