Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात गणेशोत्सवावर विजेचे विघ्न कायम

By admin | Updated: September 1, 2014 04:59 IST

वसई पूर्व भागात गणेशोत्सवामध्ये सतत वीज खंडित होत असल्यामुळे या उत्सवात विजेचे विघ्न भक्तांना जाणवत असून यामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडत आहे.

पारोळ : वसई पूर्व भागात गणेशोत्सवामध्ये सतत वीज खंडित होत असल्यामुळे या उत्सवात विजेचे विघ्न भक्तांना जाणवत असून यामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडत आहे.गणपती उत्सवाच्या सुरूवातीपासून वीज या भागात सतत खंडित होत होती. आरास करण्याच्या वेळीही वीज अनेक तास गायब झाल्यामुळे आरास अंधारात कशी करायची हा ही प्रश्न उभा राहिला होता. गणपती स्थापनेच्या दिवशीही अनेक तास वीज गायब होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. गणेशाच्या आरासीसाठी असलेली अनेक उपकरणे ही विजेवर चालणारी असल्यामुळे आरास करून देखील विजेच्या अभावी ही उपकरणे न चालू झाल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजी पसरली. शिरसाड, मांडवी, चांदीप, शिवणसई, उसगाव, पारोळ, शिरवली, सायवन इ. गावांमध्ये गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणावर अंधाराची छाया पसरली होती. यावेळी वीज मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता विद्युत पुरवठा करणारी वीजवाहिनी तुटल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.