Join us

प्रभाग समित्यांसाठी इच्छुकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:25 IST

महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी पक्षातील पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये चुरस असते. त्यामुळे इच्छुक व उत्साही दुसऱ्या फळीतील नगरसेवक प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी गळ लावून बसलेले असतात.

मुंबई : महापालिकेच्या वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी पक्षातील पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये चुरस असते. त्यामुळे इच्छुक व उत्साही दुसऱ्या फळीतील नगरसेवक प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी गळ लावून बसलेले असतात. या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाल्याने किमान हे पद खिशात घालण्यासाठी इच्छुक नगरसेवकांनी वरिष्ठांची मनधरणी करण्यास व पक्षात आपले वजन वापरण्यास सुरुवात केली आहे.महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुका १२ व १३ एप्रिल रोजी तर एका प्रभाग समितीची निवडणूक १९ एप्रिल रोजी होणार आहे. मुंबई महापालिकेचा स्थानिक पातळीवरील कारभार या प्रभाग समित्यांच्या माध्यमातून चालविण्यात येतो. सध्या १७ पैकी ८ प्रभाग समित्या भाजपाकडे, एक प्रभाग समिती अखिल भारतीय सेनेकडे, तर शिवसेनेकडे सहा समित्या असून एक शिवसेनेच्या पाठिंब्यावर मनसेकडे आहे.मनसेचे सहा नगरसेवक पक्षात आल्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. मनसेत असताना एल प्रभागाच्या अध्यक्षपदी निवडून आलेले दिलीप लांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हा प्रभाग शिवसेनेकडे राहणार आहे. मनसेतून घाटकोपर येथील दोन नगरसेवक शिवसेनेत आल्याने एन विभागही शिवसेनेकडेच राहणार आहे.निवडणुकीची तारीख - प्रभाग समिती१२ एप्रिल - ए, बी आणि ई, सी आणि डी, एफ उत्तर आणि एफ दक्षिण, जी दक्षिण, आर मध्य आणि आर उत्तर, आर दक्षिण, पी उत्तर, पी दक्षिण१३ एप्रिल - जी उत्तर, एच पूर्व व एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, एम पश्चिम, एल, एन, एस, टी१९ एप्रिल - एम पूर्व