मुलुंड : मुलुंड पूर्वेकडील देशमुख उद्यानासमोर एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी घडली. यामध्ये कार जळून खाक झाली असून, चालकाने कारबाहेर वेळीच पळ काढल्यामुळे तो बचावला आहे.मुलुंड पूर्वेकडे राहणारे कारचालक दयाशंकर यादव हे मारुती ८०० कारने घरी परतत होते. दरम्यान, शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास सावरकर रुग्णालय येथून जात असताना अचानक गाडीतून धूर येत असल्याचे यादव यांंच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ गाडीबाहेर धाव घेतली आणि कारने पेट घेतला. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. भररस्त्यात कारला लागलेल्या आगीमुळे परिसरात वाहतूककोंडी झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण आणत कार रस्त्याच्या कडेला उभी केली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
धावत्या कारला आग
By admin | Updated: January 26, 2015 00:33 IST