Join us

नेपाळचे बुकिंग रद्द करण्यासाठी धावपळ

By admin | Updated: May 8, 2015 00:12 IST

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत नेपाळमध्ये देवदर्शन आणि पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले जाते. मात्र विनाशकारी भूकंपामुळे जिल्ह्यातील

पनवेल/ ठाणे : दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत नेपाळमध्ये देवदर्शन आणि पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले जाते. मात्र विनाशकारी भूकंपामुळे जिल्ह्यातील पर्यटकांनी नेपाळकडे यंदा पाठ फिरवली आहे. याशिवाय आगाऊ बुकिंग रद्द करण्यासाठीही पर्यटकांची धावपळ सुरू झाली आहे. दोन वर्षांपूर्वी उत्तरेतील प्रलय आणि आताचा भूकंप यामुळे चारधाम यात्रांवर मोठा परिणाम झाला असल्याची माहिती येथील ट्रॅव्हल कंपन्यांनी दिली. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत हजारो पर्यटक नेपाळमध्ये जातात. यावर्षीही काही प्रमाणात बुकिंग झाले होते. मात्र, भूकंपानंतर अनेकांनी बेत बदलला आहे. प्रमुख ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत, त्यांचा सर्वांचा हाच अनुभव आहे. जानेवारी ते जून हा पनवेल परिसरातील पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्यांचा काळ असतो. दोन वर्षांपूर्वी चारधाम यात्रा करणाऱ्यांची संख्या मोठी होती. उत्तर भारतात जाऊन आलेली ही मंडळी नंतर नेपाळमध्येही जाऊन येत होती. हिमालयातील देवस्थानांची यात्रा करण्याचीही पद्धत होती. मात्र, केदारनाथला दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रलयामुळे तेथे जाणाऱ्यांची संख्या एकदम घटली. या वर्षी झालेल्या भूकंपामुळे हिमालयातील यात्रा आता धोकादायक मानली जाऊ लागली आहे. नेपाळच्या सहली तर ऐनवेळी रद्द झाल्याने विमान आणि अन्य सुविधांचे बुकिंग रद्द करताना भरावे लागणाऱ्या शुल्काचा भुर्दंड पडत आहे. आपत्ती आल्यानंतर त्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेणे अवघड बनते. घटना घडल्यावर प्रशासन हा शोध सुरू करते. त्यामुळे यासाठी पर्यटन विकास महामंडळ किंवा जिल्हा प्रशासनाच्या मदतीने स्वतंत्र यंत्रणा विकसित करण्याची मागणी पुढे येत आहे. ट्रॅव्हल्स कंपन्या किंवा खासगीरीत्या प्रवासाला निघालेल्यांची माहिती जिल्हा ठिकाणी नोंदली जावी. यासाठी नागरिकांना आवाहन केले तर स्वत:हून नागरिक यासाठी पुढे येऊ शकतील. त्यातून आपतग्रस्तांना मदत पोहोचविणे शक्य होईल, असे ट्रॅव्हल्स कंपन्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, काही पर्यटकांनी आता आपला बेत बदलविला असून अन्य पर्याय शोधत आहे. (वार्ताहर)