मुंबई : गोकूळ निवासच्या दुर्घटनेमुळे काळबादेवीतील जुन्या इमारतींमध्ये वास्तव्य करणारे रहिवासी हादरले आहेत़ भयभीत झालेल्या अशा असंख्य रहिवाशांनी आपल्या इमारतीच्या सुरक्षेसाठी स्थानिक विभाग कार्यालयाकडे धाव घेतली आहे़ इमारतीची दुरुस्ती अथवा पुनर्विकासासाठी परवानगी देण्याचे साकडे अनेकांनी पालिका प्रशासनाला घातले आहे़घाऊक बाजारपेठ असलेल्या काळबादेवी, भुलेश्वर परिसरात दागिने घडविणारे छोटे कारखाने, त्यासाठी लागणारा रसायनांचा साठा, अरुंद रस्ते, चिंचोळ्या गल्ल्यांमुळे या विभागाचा धोका वाढला आहे़ शनिवारी गोकूळ निवास आगीत भस्मसात झाल्यानंतर येथील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे़ त्यामुळे आपल्यावर अशी वेळ येऊ नये, म्हणून अनेक रहिवासी सी विभाग कार्यालयात गर्दी करू लागले आहेत़या विभागातील साडेतीन हजार इमारती असून यातील ३२०० इमारती या शंभर वर्षे जुन्या आहेत़ मात्र उपकरप्राप्त असलेल्या या इमारती म्हाडाच्या अखत्यारीत येतात़ तरीही धास्तावलेल्या रहिवाशांना मार्गदर्शन व इमारतींची दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीबाबत माहिती देण्यासाठी इमारत प्रस्ताव विभागाकडे पाठविण्यात येत असल्याचे सी विभागातील सूत्रांकडून समजते़ तसेच या वॉर्डातील जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांच्या बांधकाम स्थैर्यतेचा अहवाल लवकरच तयार करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
इमारतींच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे धाव
By admin | Updated: May 14, 2015 01:09 IST