Join us  

मुंबईत टोळधाडीची अफवा; महापालिकेच्या कीटकनाशक विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 2:52 AM

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळपासूनच टोळ निदर्शनास आल्याच्या बातम्यांचा पूर आला.

मुंबई : आफ्रिकेतून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात दाखल झालेले टोळ आता देशासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात नजरेस पडत आहेत. राज्यातही बहुतांश ठिकाणी टोळधाड आल्याचे वृत्त कानी पडत असतानाच मुंबईतही टोळ दाखल झाले आहेत, असे वृत्त सोशल मीडियाद्वारे वाऱ्यासारखे पसरले आणि मुंबईकरांना धडकी भरली. प्रत्यक्षात मुंबई पालिकेने मात्र या वृत्ताचा इन्कार केला. टोळ हे हवेच्या प्रवाहाशी निगडित वाहतात आणि जेथे अधिक हिरवळ असेल तेथे त्यांचे अस्तित्व जाणवते. परिणामी, मुंबईत टोळ दाखल झाले नाहीत, असे पालिकेच्या कीटकनाशक विभागाने सांगितले.

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी सकाळपासूनच टोळ निदर्शनास आल्याच्या बातम्यांचा पूर आला. सोशल मीडियाने ‘मुंबईवर टोळधाड’ हा विषय लावून धरला. कुलाबा, ताडदेव, वरळी, विक्रोळी येथे टोळ निदर्शनास आल्याचे संदेश व्हायरल होऊ लागले.दरम्यान, यात काहीही तथ्य नाही. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने हे तपासले आहे. मात्र असे काहीच निदर्शनास आले नाही, असे मुंबई पालिकेने स्पष्ट केले. मुंबई एअर ट्राफिक कंट्रोलकडील माहितीनुसार, अद्याप मुंबईत कुठेही टोळ निदर्शनास आले नाहीत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र लक्ष ठेवले जात आहे.

छायाचित्रे जयपूरमधील

पूर्व उपनगरातील निसर्गमित्र विजय अवसरे यांनी सांगितले की, त्यांनाही मुंबईत टोळ दाखल झाल्याची छायाचित्रे सोशल मीडियाद्वारे पाहायला मिळाली. मात्र ती तपासली असता जयपूर येथील असल्याचे निदर्शनास आले.

पाहणीत टोळधाड नसल्याचे स्पष्ट

मुंबईत टोळधाड आल्याची चर्चा गुरुवारी होती. समाजमाध्यमांत याबाबत दावे केले जात होते. त्या अनुषंगाने विभागाने पडताळणी केली. कृषी सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने याबाबत पाहणी केली असता मुंबईत टोळधाड नसल्याचे स्पष्ट झाले आहे.- एकनाथ डवले, कृषी सचिव

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका