Join us

मोफत जागेची अफवा अन् रातोरात उभ्या राहिल्या शेकडो झोपड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:24 IST

विक्राेळीतील प्रकार : हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ठाेकला तंबूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागेचा मालक मेल्याने त्याने सर्व ...

विक्राेळीतील प्रकार : हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांनी ठाेकला तंबू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जागेचा मालक मेल्याने त्याने सर्व जागा दान केल्याचे समजताच, विक्रोळीत रातोरात शेकडो झोपड्या उभ्या राहिल्याने त्यांना हटविताना संबंधित प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. तक्कादायक बाब म्हणजे गेल्या १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू होता.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड परिसरातील विक्रोळीच्या दिशेने येणाऱ्या मार्गात शासनाचा मोकळा भूखंड आहे. याच भूखंडाच्या मालकाचे निधन झाले असून, त्यांनी हा भूखंड गरिबांना राहण्यासाठी दान केल्याची अफवा पसरली. याच अफवेतून मुंबईत हक्काच्या घराची स्वप्ने बघणाऱ्यांनी लाकडी बांबू, कापड घेऊन जागा अडविण्यास सुरुवात केली, तंबू ठाेकला. अचानक मोकळ्या भूखंडातील गर्दी पाहून स्थानिकांनी चाैकशी केली. मुंबई, ठाणे नवी मुंबईतील रहिवाशांनीही येथे धाव घेतली. यात राजकीय मंडळीही मागे नव्हती. त्यातूनच वाद, हाणामारी सुरू होताच, पोलीस आणि पालिकेचे लक्ष यावर गेले.

स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींनी तेथे धाव घेतली. त्यानुसार, संबंधित प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने शनिवारी हा भूखंड काही प्रमाणात रिकामी केला. रविवारीही येथील मंडळी जागा सोडण्यास तयार नसल्याने त्यांना हटविताना पोलिसांची दमछाक झाली. अजूनही काही जण तेथेच थांबून आहेत.

* अनेकांनी जागा अडवली

अफवा पसरली कशी, याचे गूढ कायम आहे. जागा अडविलेल्यांपैकी पवई हिरानंदानी येथे घरकाम करणाऱ्या महिलेकडे याबाबत विचारणा करताच, ‘आधीच भाड्याच्या घरात राहतो, त्यात कोरोनामुळे भाडे देणेही शक्य होत नाही. मोफत जागा मिळणार असल्याचे समजताच जागा अडविली,’ असे तिने सांगितले. या महिलेप्रमाणेच अनेक जण येथे जागा अडवून होते. याबाबत विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

..........................

दलालामार्फत खरेदी-विक्रीचा व्यवहार

आमदार सुनिल राऊत हे लवकरच म्हाडाचे अध्यक्ष होणार आहेत, सगळ्यांना रूम मिळणार आहेत, अशा प्रकारच्या चर्चा ऐकून या अफवेत भर पडली, तसेच काही दलालामार्फत खरेदी-विक्रीचा व्यवहारही चालू झाला.

.....

सुरुवातीला दुर्लक्ष

स्थानिक रहिवासी अश्विन भागवत याने दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळीमध्ये मोठ्या प्रमाणावर भूखंड हडपण्याचा काम सुरू असल्याने, याबाबत ११ डिसेंबर रोजी पोलिसांना कळविले. मात्र, त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. नंतर प्रकरण सर्वदूर पसरल्याने त्यावर कारवाई करण्यात आल्याचे त्याने नमूद केले.