Join us

खंडणी उकळणारे दोघे गजाआड

By admin | Updated: January 8, 2015 00:36 IST

शिधावाटप केंद्र चालकाला ठार मारण्याची धमकी देत तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटने गजाआड केले आहे.

मुंबई : शिधावाटप केंद्र चालकाला ठार मारण्याची धमकी देत तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटने गजाआड केले आहे. प्रफुल्ल कांबळे व दिनेश भानुशाली अशी दोघांची नावे आहेत. यापैकी कांबळे हा स्वत:ला एका साप्ताहिकाचा संपादक आणि राष्ट्रीय राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे भासवतो. कांबळे याने अशा प्रकारे आणखी अनेक व्यापारी, व्यावसायिकांकडून खंडणी उकळली असावी असा दाट संशय गुन्हे शाखेला आहे.या गुन्ह्यातील तक्रारदाराचे मुलुंडमध्ये शिधावाटप केंद्र आहे, तर त्याचा मुलगा असेच एक केंद्र भागीदारीत चालवितो. कांबळे व भानुशाली यांनी माहिती अधिकार वापरून मिळविलेल्या माहितीच्या आधारे तक्रारदारास धमक्या देण्यास सुरुवात केली. तसेच तीन लाखांची खंडणीही मागू लागले. कंटाळून तक्रारदाराने काही रक्कम या दोघांना देऊ केली. मात्र या दोघांनी उर्वरित रकमेसाठी पुन्हा या व्यावसायिकाकडे तगादा लावला. तसेच ही रक्कम न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा मात्र या व्यावसायिकाने गुन्हे शाखेकडे धाव घेतली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटने हा तपास स्वत:कडे घेतला. काल रात्री अधिकाऱ्यांनी मुलुंड कॉलनी परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. या दोघांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस कोठडीत दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी सुरू असल्याचे समजते. (प्रतिनिधी)