Join us

रुळालगतची झाडी गुन्हेगारांना खतपाणी

By admin | Updated: September 25, 2014 00:59 IST

रेल्वे रुळालगत वाढलेल्या झाडीचा वापर गुन्हेगार लपण्यासाठी करत असून काही अपघातांमधील मृतदेह देखील झाडींमध्ये पडत आहेत.

नवी मुंबई : रेल्वे रुळालगत वाढलेल्या झाडीचा वापर गुन्हेगार लपण्यासाठी करत असून काही अपघातांमधील मृतदेह देखील झाडींमध्ये पडत आहेत. अशा वेळी रेल्वे पोलिसांना तपास करताना ही झाडी मुख्य अडथळा ठरत आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला झाडी नष्ट करण्याचे पत्र देऊनही कारवाई होत नसल्याने पोलिसांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर प्रवाशांच्या सुरशेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नवी मुंबईतून ठाणे, पनवेल व मुंबई असे उपनगरीय रेल्वेचे नेटवर्क आहे. या मार्गावर रेल्वे प्रवाशांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच अपघाताच्या घटनाही वाढत आहेत, तर काही प्रमाणात चोरटे व लुटारू यांचाही त्रास या प्रवाशांना होत आहे. मात्र या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे पोलिसांना मोठा अडथळा ठरत आहे तो रुळालगत असलेल्या झाडी व झुडपांचा. पावसाळ्यात पुरेशे पाणी मिळाल्याने ही झाडी चार फुटांहून अधिक उंच वाढतात. त्यामुळे सर्वच रेल्वे रुळांलगत या झुडपांचे दाट कुंपण तयार झाले आहे.रेल्वे अपघातांमधील मृतदेहांचा शोध घेण्यातही रेल्वे पोलिसांची चांगलीच अडचण होत आहे. रेल्वेच्या धडकेने अथवा रेल्वेतून पडून प्रवाशांसोबत अपघाताच्या घटना सातत्याने होत असतात. अशा दुर्घटनांमधील जखमी अथवा मृत व्यक्तीही याच दाट झाडीमध्ये दडले जात असतात. अशा अपघातग्रस्तांचा शोध घेण्यातही रेल्वे पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तर जखमी प्रवासी झाडीमध्ये पडून राहिल्यास मदतीला विलंब होत असून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे रूळांलगतची ही झाडी रेल्वे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत सीवूड ते गोवंडी व वाशी ते रबाळे हा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर रुळालगत वाढलेली झाडी काढण्याचे पत्र रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे. मात्र अद्याप ही झाडी तशीच असल्याने रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)