Join us

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविड १९ विषाणूचे नवीन व वेगाने फैलावणारे प्रकार आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे केंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविड १९ विषाणूचे नवीन व वेगाने फैलावणारे प्रकार आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यूके, युरोप, मध्यपूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलँड, झिम्बाब्वे या देशांमधून अथवा या देशांमार्गे हवाई प्रवास करून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांना आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शुक्रवार ३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून हा नियम लागू असणार आहे.

केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, हवाई प्रवास करून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची तरतूद रद्द करण्यात आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, यापूर्वीचे परिपत्रक रद्द केल्याने दोन्ही कोविड डोस झालेले प्रवासी, ६५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक यांनाही यातून सूट मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या सर्व प्रवाशांना मागील ७२ तासांमधील निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे आवश्यक असणार आहे.

असे आहेत नवीन नियम

* ७२ तासांपूर्वीचा कोविड निगेटिव्ह चाचणी अहवाल सादर करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल.

* सर्व प्रवाशांनी स्वयंघोषणा-पत्र, तसेच हमीपत्र भरून विमानतळावर नियुक्त संबंधित अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक असेल. या प्रवाशांना १४ दिवस गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.

*सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार प्रति चाचणी ६०० रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल. चाचण्या वेगाने करणे शक्य व्हावे, म्हणून प्रत्येक तासाला सुमारे ६०० प्रवाशांची चाचणी करता येईल.