Join us

‘आरटीपी’ कार्यकर्त्यांची पुन्हा निराशा

By admin | Updated: November 6, 2014 01:45 IST

महापालिका अधिका-यांना दिवाळीनिमित्त डर्टी ग्रिटिंग्ज पाठवल्यानंतर राइट टू पी कार्यकर्त्यांना ५ नोव्हेंबर रोजी चर्चेसाठी बोलावले होते

मुंबई : महापालिका अधिका-यांना दिवाळीनिमित्त डर्टी ग्रिटिंग्ज पाठवल्यानंतर राइट टू पी कार्यकर्त्यांना ५ नोव्हेंबर रोजी चर्चेसाठी बोलावले होते. आज झालेल्या बैठकीमध्ये आरटीपी कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. महिला मुताऱ्यांचे काम चांगल्या पद्धतीने व्हायला हवे असल्यास महापालिका अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता असल्याचे आरटीपी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.वॉर्ड स्तरावर काही अधिकारी चोखपणे काम करीत आहेत. मात्र, त्यांना वरच्या पदावरील अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याचे जाणवत आहे. यामुळे महिला मुताऱ्यांच्या संदर्भातील कामे रखडत आहेत. बैठकीचा अजेंडा आधीच सांगा, असे महापालिका प्रशासनाला सागितले होते. मात्र, शेवटपर्यंत त्यांनी काहीच सांगितले नव्हते. आजच्या बैठकीमध्ये त्यांनी पुढे बैठका कधी घ्यायच्या, यापलीकडे उपाययोजनांबद्दल सांगितलेले नाही. बैठकीला तीनच अधिकारी उपस्थित होते. इतर अधिकारी स्वच्छ अभियानात असल्यामुळे त्यांना यायला जमले नाही, असे सागितले.२०११ मध्ये काढलेले परिपत्रक आणि १४ आॅगस्ट २०१४ रोजी आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे काय झाले, असा प्रश्न विचारल्यावर, महापालिका अधिकाऱ्यांनी ठोस उत्तर दिले नाही. निवडणुका, दिवाळी, स्वच्छता अभियान अशी कारणे पुढे केली. भविष्यातील तरतुदी काय, असे विचारल्यावर विभागीय स्तरावर बैठका घेण्यात येतील, हे उत्तर मिळाले. मात्र, असलेल्या मुताऱ्यांसाठी काय करणार, नवीन मुताऱ्या कुठे बांधणार या विषयांना बगल दिली. (प्रतिनिधी)