Join us

‘आरटीओ अधिकाऱ्याचे जबाब नोंदवणार’

By admin | Updated: February 1, 2015 01:40 IST

अभिनेता सलमान खानविरुद्ध सुरू असलेल्या हिट अ‍ॅण्ड रन खटल्याप्रकरणी आरटीओचे निरीक्षक व दोन हवालदार यांचे जबाब नोंदवण्याचे आदेश सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाला दिले़

मुंबई : अभिनेता सलमान खानविरुद्ध सुरू असलेल्या हिट अ‍ॅण्ड रन खटल्याप्रकरणी आरटीओचे निरीक्षक व दोन हवालदार यांचे जबाब नोंदवण्याचे आदेश सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाला दिले़या अधिकाऱ्यांचे जबाब आरोपपत्रात नाहीत, मात्र अपघातावेळी सलमानजवळ ड्रायव्हिंग लायसन्स होते की नव्हते, हे यांच्या साक्षीतून स्पष्ट होईल़ तेव्हा यांची साक्ष नोंदवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात सादर केला आहे़त्यावरील निर्णय प्रलंबित आहे़ त्याआधी या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवा व ते न्यायालयात सादर करून त्याची एक प्रत बचाव पक्षालाही द्या़ हे जबाब वाचल्यानंतर सरकारी पक्षाच्या अर्जावर निर्णय दिला जाईल, असे सत्र न्यायाधीश डी़डब्ल्यू़ देशपांडे यांनी स्पष्ट केले़ तसेच शनिवारी डॉ़ शशिकांत पवार यांची उलटतपासणी पूर्ण झाली़ डॉ़ पवार यांनी सलमानच्या रक्ताचे नमुने घेतले़ हे नमुने सीलबंद नव्हते, असा दावा सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला़ तो डॉ़ पवार यांनी फेटाळून लावला़ यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे़ वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत सलमानने चौघांना चिरडले़ यात एकाचा बळी गेला़ या प्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे़